चार वर्षांत सापडले मेंदूज्वराचे सात रुग्ण; मृत्यू रोखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:00 AM2021-06-10T05:00:00+5:302021-06-10T05:00:02+5:30
मागील चार वर्षांत एकाही जपानी एनसेफेलिटिस बाधिताचा मृत्यू झाला नसला, तरी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. जपानी एनसेफेलिटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे. तो मनुष्यासह प्राण्यांना समानप्रकारे बाधित करतो. जपानी एनसेफेलिटिस हा सामान्य आजार समजला जात असून, तो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. साधारणत: तीन ते सहा वयोगटातील चिमुकले प्रभावित होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्याच्या दिवसांत कीटकजन्य आजार डोके वर काढतात. त्यात जपानी एनसेफेलिटिस (मेंदूज्वर)चाही समावेश आहे. या आजाराची साधी-साधी लक्षणे असून, मागील चार वर्षांत जिल्ह्यात जपानी एनसेफेलिटिसची तब्बल सात रुग्ण सापडल्याची नोंद आरोग्य यंत्रणेतील हिवताप विभागाने घेतली आहे.
मागील चार वर्षांत एकाही जपानी एनसेफेलिटिस बाधिताचा मृत्यू झाला नसला, तरी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. जपानी एनसेफेलिटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे. तो मनुष्यासह प्राण्यांना समानप्रकारे बाधित करतो. जपानी एनसेफेलिटिस हा सामान्य आजार समजला जात असून, तो लसीकरणाद्वारे रोखला जाऊ शकतो. साधारणत: तीन ते सहा वयोगटातील चिमुकले प्रभावित होतात. फ्लेविवियरस जीनच्या व्हायरसमुळे जपानी एनसेफेलिटिस होत असला तरी, तो सामान्यत: डास चावल्यामुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून आपल्या घराच्या परिसरात कुठे पाणी साचून डासांची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करणे गरजचेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह जपानी एनसेफेलिटिस नागरिकांच्या अडचणीत भर टाकू शकते. त्यामुळे कोराेना विषयक खबरदारी घेतानाच यंदाच्या पावसाळ्यात या आजारांना रोखण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून नागरिकांना विशेष दक्षता बाळगावी लागणार आहे.
प्राथमिक लक्षणे
बहुतेक रुग्णांत कोणतेच लक्षण दिसत नाहीत. असे असले तरी ताप, डोकेदुखी, मरगळलेपणा, पातळ शौच, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, स्नायूंमध्ये असामान्य कडकडपणा, हालचालींमध्ये अपंगत्व, झटके येणे ही जपानी एनसेफेलिटिसची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा नागरिकांनी औषधोपचार
जपानी एनसेफेलिटिसचे लक्षणे आढळल्यास बाधित व्यक्तीने कुठलीही हयगय न करता नजीकच्या रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे क्रमप्राप्त आहे. असे केल्यास जपानी एनसेफेलिटिस मृत्यू टाळण्यास मदत होते, असे सांगण्यात आले.
पावसाळ्याच्या दिवसांत कीटकजन्य आजार डोकेवर काढतात. त्यामुळे सध्याच्या कोविड संकटात प्रत्येक नागरिकाने आपल्या घराच्या आवारात कुठे डासांची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करावी. शिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. कोरडा दिवस हा डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लावण्यासाठीचा प्रभावी उपाय आहे.
- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.