सात दशकांपासून शहर उपेक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:22 PM2018-04-09T23:22:08+5:302018-04-09T23:22:08+5:30
जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण व कामगार शहर म्हणून ओळख असलेले पुलगाव शहर विकासापासून वंचित राहिले. सात दशकांपासून परिसराच्या दृष्टीने येथील विकास झालेला नाही. यात भर म्हणून येथील वस्त्रोद्योग बंद पडला असून शकुंतला रेल्वे सद्यस्थितीत बंदिस्त आहे.
येथे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध असतानाही मागील सात दशकांत हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. कधी ताई तर कधी भाऊ यांच्या प्रतिष्ठेत विकास होणे तर दुरच वादामुळे शहराचे नुकसानच झाले. इंग्रजांच्या कार्यकाळात सुरू झालेला पुलगाव कॉटन मिल हा वस्त्रोद्योग बंद झाला. पुलगाव-आर्वी शकुंतला रेल्वेगाडी बंद झाली आहे. सत्ता परिवर्तनानंतरही एकमात्र असलेला बीईसी खत कारखानाही दोन वर्षापासून बंद पडलेला आहे. त्यामुळे येथे बेरोजगारीची समस्या आहे.
राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या शहराने दिले. मंत्रीपदही शहराला मिळाले. परंतु राजकीय क्षेत्रातील वर्चस्वाच्या कुरघोडीत सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली. कॉँग्रेसचे खासदार वसंत साठे यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले. लोहपुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. मात्र त्यावेळी शहरात येणारा रेल्वे कोच कारखाना हरियाणा राज्यात गेला अशी खंत पुलगावकर व्यक्त करतात.
शहराला तालुक्याचा दर्जा व औद्योगीक वसाहतीचा प्रश्न आजही खितपत आहे. तालुक्याचा दर्जा व औद्योगिक वसाहत मात्र देवळी शहराला देण्यात आला. या शहराच्या सिमेवरून वर्धा नदी वाहते. शहरातून मुंबई-हावडा रेल्वे मार्ग नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग हैद्राबाद-भोपाल महामार्ग अशी दळणवळणाची सुविधा आहे. कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात होते म्हणून इंग्रज शासनाने नागपूरचे उद्योगपती बुटी यांच्या माध्यमातून १८८९ मध्ये मोठा वस्त्रोद्योग सुरू केला. आष्टी, वरूड, आर्वी भागातील कापूस व संत्र्याची बाजारपेठ पाहून पुलगाव, आर्वी ही मीटर गेज रेल्वेगाडी सुरू केली. सर्व भौगोलिक सुविधांचा विचार करून इंग्रज शासनाने १९४२ साली पुलगाव येथे दारूगोळा भांडाराची स्थापना केली. इतकेच नव्हे तर इंग्रज शासनाला या ब्रीज टाऊनचे भौगोलीक व औद्योगिक महत्व वाटले म्हणून त्यांनी परिसरातील कवठा (रेल्वे) येथे जिल्ह्याचे मुख्य प्रशासन आणून कवठा (रे.) जिल्ह्याचा दर्जा दिला. त्यांना या परिसराचे महत्व कळले परंतु देशाच्या सत्तेत असणाऱ्या लोक प्रतिनिधींना या शहराचे महत्व कळू नये ही शोकांतिकाच आहे.
इंग्रजाच्या कार्यकाळात सुरू झालेला ३५०० कामगारांना रोजगार देणारा वस्त्रोद्योग मार्च २००३ मध्ये तर पुलगाव, आर्वी शकुतंला आॅगस्ट २००८ मध्ये बंद झाली. त्यामुळे शहराच्या विकासाच्या वाटा बंद झाल्या. २०० कामगारांना रोजगार देणारा विदर्भ सुपर फॉस्फेट कारखाना बंद झाला. त्यानंतर बीईसी फर्टिलाइझर हा खत कारखानाही दोन वर्षापासून बंद आहे. पुलगाव-आर्वी मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर व्हावे व हा मार्ग आमलापर्यंत वाढविण्याच्यादृष्टीने मागणी आहे.
पुलगाव शहराला तालुक्याचा दर्जा देण्याचा प्रश्न खितपत आहे. येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्नही शासन दरबारी रेटला व अनेक कार्यक्रमातून पुलगाव शहराला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याची घोषणाही लोकप्रतिनिधींनी केली. यामुळे शहरवासियाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला खरा पण, याची अंमलबजावणी करण्याची गरज शहरवासी व्यक्त करतात.
तालुक्याची प्रतीक्षा
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपा राज्य व केंद्रात सत्तेवर आली. येथे भाजपाचे खासदार आहे. त्यांनी चार वर्षाच्या कार्यशाळात काही रेल्वे गाड्यांच्या येथे थांबा मिळवून दिला. सदर प्रलंबित प्रश्न सोडवून मतदारांच्या मनात विकासाची आशा निर्माण केली आहे.