188 किमीच्या सात दर्जोन्नत रस्त्यांना मिळाली नवी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 05:00 AM2021-09-23T05:00:00+5:302021-09-23T05:00:20+5:30
या रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार होत प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष दुरूस्तीच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील तब्बल सात ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून नवी ओळख देण्यात आली आहे. यात हिंगणघाट तालुक्यातील सहा तर देवळी तालुक्यातील एका रस्त्याचा समावेश असून या सातही दर्जोन्नत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासनाकडे अर्थसंकल्पीय प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला शासनाने हिरवी झेंडी दिली असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत हे मार्ग लवकरच गुळगुळीत होणार आहेत.
हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ-सेलू-नरसाळा-काजळसरा हा २०.६०० किमीचा मार्ग, चिंचोली वाघोली-इंझाळा-पिंपळगाव-येरणवाडी- आर्वी- वडनेर- टेंभा- दोंदुर्डा- शेकापूर (बाई)- सेलू- कोल्ही ढिवरी-पिपरी सावंगी-येरला हा ६५ किमीचा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ७ ते पोहणा-सास्ती-ढिवरी-पिपरी-खेकडी-धानोरा ते प्रमुख जिल्हा मार्ग २३ ला मिळणारा १५ किमीचा मार्ग, पिंपळगाव-उमरी मुरपाड-सेलू-काजळसरा हा १५ किमीचा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग २३ ते खापरी पिपरी-जांगोणा-वेणी-सास्ती हा २३ किमीचा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ३२९ ते कांचणगाव-येरणगाव-मानकापूर-फुकटा-भिवापूर हा १३ किमीचा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ३२९ ते नांदगाव-चिंचोली-पारडी-टेंभा हा १६.४०० किमीचा मार्ग तसेच देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ३६१ ते शिरपूर (खर्डा)-बोपापूर(वाणी)-अंदोरी-घोडेगाव-कोळोणा ते राष्ट्रीय महामार्ग ३३४ ला जोडणारा २० किमीचा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जिल्हा परिषदेकडून हे सातही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे तर या रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार होत प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष दुरूस्तीच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
दहा कोटींचा निधी होणार खर्च
n या सात दर्जोन्नत रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षीत धरला जात आहे. असे असले तरी अजूनही या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नसून लवकरच शासनाकडून निधी उपलब्ध होईल अशी आशा सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे.
निविदा प्रक्रियेचे काम युद्धपातळीवर
- शासनाकडून मंजूरी मिळताच हे सातही दर्जोन्नत रस्ते लवकरात लवकर कसे गुळगुळीत होईल यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी कामाला लागले असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.
सदर दर्जोन्नत सात रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. निधी अजून मिळाला नसला तरी तो लवकरच शासनाकडून मिळेल. सध्या निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
- प्रकाश बुब, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, वर्धा