दीड महिन्यात सात घरफोड्या करणारे गजाआड, सोन्या-चांदीसह रोख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:31 PM2019-07-22T14:31:47+5:302019-07-22T14:32:04+5:30
चोरट्यांच्या सात जणांच्या या टोळीतील दोन जण सध्या कारागृहात असून ते चोरीच्या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडी भोगत आहेत.
वर्धा : मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणा-या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम चांदी जप्त केली आहे. रामा देवराव देऊळकर (२३), किसना रमेश राऊत (२५), राजू उर्फ काल्या रामा दांडेकर (२६) व मंगेश बाबुलाल गुंजेवार (२४) सर्व रा. बोरगाव (मेघे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चोरट्यांच्या सात जणांच्या या टोळीतील दोन जण सध्या कारागृहात असून ते चोरीच्या गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. तर शंक उर्फ शंक्या राऊत हा फरार आहे. याच टोळीतील चोरट्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारील सुनील उमरे यांच्या घरासह देशोन्नती कार्यालयातही चोरी केली होती. विशेष म्हणजे या टोळीतील दोन सदस्य पूर्वी रेकी करीत तर चोरी करताना तीन जण पाळत ठेवत होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात एएसआय दत्तात्रय ठोंबरे, विवेक लोणकर, बाबाराव बोरकुटे, पोलीस शिपाई राजू वैरागडे, सचिन इंगोले, जगदीश चव्हाण, महादेव सानप, अरविंद घुगे, रितेश गुजर, दिनेश राठोड, गितेश देवघरे, सचिन दिक्षीत, पवन निलेकर, विकास मुंडे, गंगाधर चांभारे यांनी केली.