२४ तासात सात लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:00 PM2018-06-09T23:00:58+5:302018-06-09T23:00:58+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन करारासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याने शनिवारी दुसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी वेतन करारासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला. आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नसल्याने शनिवारी दुसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच होते. सदर आंदोलनादरम्यान या २४ तासात रापमच्या वर्धा विभागात दीडशेपेक्षा अधीक बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
जिल्ह्यात रापमचे वर्धा, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव असे पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज सुमारे ३५९ बस फेºयांचे नियोजन केले जाते. संपाच्या पहिल्या दिवशी अल्प मनुष्यबळामुळे अनेक बसफेऱ्या रद्द झाल्या. या संपात रापमचे वाहक व चालकांसह कर्मचारी सहभागी झाल्याने रापमंची वाहतूक सेवा संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रभावित झाल्याचे दिसून आले.
शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या होत्या. तर शनिवारी दुपारी १२ वाजता केवळ १८८ फेऱ्या सोडण्यात आल्याचे रापमच्या अधिकाऱ्यानी सांगितले. रापम कामगारांच्या या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील पाचही आगारात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसी बंदोबस्तातच रापमच्या वर्धासह पुलगाव, आर्वी, हिंगणघाट व तळेगाव आगारातून बसेस सोडल्या जात होत्या. सदर संपामुळे काही प्रमाणात नागरिकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामनाच करावा लागला.
आंदोलन तीव्र होण्याचे संकेत
रापमच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शुक्रवारपासून संप पुकारला. या संपात कामगार संघटनेचे संपूर्ण तर एमएमकेचे काहीच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याने रापमची वाहतूक सेवा विशेष प्रभावित झाली नाही. आंदोलनाच्या दुसऱ्याही दिवशी संबंधितांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर विचार झाला नाही. यामुळे शनिवारी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. येत्या काही तासात मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास इतर संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे आंदोलन पुढील काही दिवसात तीव्र होण्याची शक्यता वर्तविला जात आहे.
आंदोलनात सहभागींचा मागविला अहवाल
बेमुदत संपामुळे रापमची प्रवासी वाहतूक सेवा विस्कळली आहे. या संपाचा सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रापम कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन गैरकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील पाचही आगारातून सदर संपात कोणकोण सहभागी आहे, याचा अहवाल रापमच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाने मागविला आहे. तो अहवाल प्राप्त होताच त्यावर काय कार्यवाही केली जाते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण
रापमच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे अवैध वाहतुकीला चांगलेच उधाण झाले आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून या काळात प्रवाशांची चांगलीच लूट केल्याचे दिसून आले. जिल्ह्यात अचानक बसफेऱ्या रद्द झाल्याची संधी साधत वर्धेतील या वाहतुकदारांकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्यात आल्याचे दिसून आहे. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. तासनतास रस्त्यावर उभे राहून येणाºया वाहनात मिळेल त्या अवैध मार्गाने प्रवास करावा लागला. संपाच्या काळात या वाहतुकदारांनी चांगलीच कमाई केल्याचे दिसून आले.