दोन दुर्घटनांत सात जणांचा बुडून मृत्यू
By admin | Published: July 2, 2017 04:00 AM2017-07-02T04:00:11+5:302017-07-02T04:00:11+5:30
राज्यात शनिवारी दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये सात जणांना बुडून मृत्यू झाला. वर्ध्यातील महाकाळी धरणात चौघांना जलसमाधी मिळाली. तर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/ सोलापूर : राज्यात शनिवारी दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये सात जणांना बुडून मृत्यू झाला. वर्ध्यातील महाकाळी धरणात चौघांना जलसमाधी मिळाली. तर, सोलापुरच्या सांगोला तालुक्यात बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला.
वर्ध्याच्या आकोली येथील महाकाळी धरणावर शनिवारी दुपारी मित्रांसह फिरायला गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. सुदैवाने त्यांच्याबरोबर असलेले अन्य चौघे थोडक्यात बचावले. यातील एका मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गौरव गुल्हाणे, श्वेता नेहारे, सोनल नाईक, शीतल प्रधान, स्नेहा पुनसे, आशिष वाघाडे, वैभव सलामे आणि कुणाल फुलकर हे महाकाळी धरणावर फिरण्याकरिता गेले होते. पाण्याचा अंदाज न घेताच धरणात उतरले. दगडावरील शेवाळावरून श्वेताचा पाय घसरल्याने दुसऱ्या मुलींनी तिचा हात पकडला. यात सोनल आणि शीतल या दोघीही पाण्याकडे ओढल्या गेल्या. त्यांना वाचविण्याकरिता गौरव गेला असता तोही पाण्यात बुडाला. तो गटांगळ्या खात असताना आशिष वाघाडे व वैभव सलामे हे दोघे त्याला वाचविण्याकरिता धावले, पण पोहोचण्यापूर्वीच गौरव पाण्यात बुडाला. स्नेहा पुनसे ही पाण्यात गटांगळ्या खात असताना तिला वाचविण्यात यश आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे.
तर, सोलापुरच्या सांगोला तालुक्यातील कटफळमध्ये शनिवारी सायंकाळी ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रोहन प्रकाश गुंजवटे (१०), संतोष अनिल धोत्रे (१०), गोपी दत्ता माने (१२) अशी मृतांची नावे असून ही इयत्ता ५ आणि ६ वीच्या वर्गात शिकणारी मुले आहेत़ शाळा सुटल्यानंतर ती पोहण्यासाठी गेली होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ती बुडाली.