सातही गटात चुरशीच्या लढती

By admin | Published: February 19, 2017 01:47 AM2017-02-19T01:47:05+5:302017-02-19T01:47:05+5:30

तालुक्यातील जि.प. च्या ७ व पं.स. च्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ११८ उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले.

Seven wrestling clashes | सातही गटात चुरशीच्या लढती

सातही गटात चुरशीच्या लढती

Next

चर्चा : वाढीव मतदानाने अनपेक्षित निकालाचे भाकीत
भास्कर कलोडे   हिंगणघाट
तालुक्यातील जि.प. च्या ७ व पं.स. च्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ११८ उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले. ग्रामीण भागातील मतदारांनी उत्साहात भरभरून मतदान केल्याने वाढीव मतदानाचा नेमका फायदा कोणाला कोणाचे मताधिक्य कोणाच्या पथ्यावर याची चर्चा होत आहे. त्यामुळे नेमका विजय कोणाचा हे सांगणे कठीण झाले आहे.
पोहणा जि.प. सद्य:स्थितीत भाजपाच्या ताब्यात आहे. या गटात भाजपा उमेदवार माधव चंदनखेडे असून निवडणुकीत विजय ही त्यांची ख्याती आहे. परंतु भाजपाचे निष्ठावंत पवार घराण्यातून प्रशांत पवार यांनी या गटात बंडखोरी करून भाजपा उमेदवाराला अडचणीत आणले. त्यामुळे भाजपाला विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांचेशी काट्याची लढत द्यावी लागल्याचे चित्र आहे. राकाँचे राऊत व काँग्रेसचे घनश्याम येरलेकर एकाच समाजाचे असल्याने झालेले मत विभाजन तर भाजपाला बंडखोरीच्या फटक्यामुळे सहज असलेली निवडणूक अतीतटीची झाल्याची चर्चा आहे.
शेकापूर (बाई) गटातील काँग्रेस उमेदवार पं.स. उपसभापती मिलिंद कोपुलवार एकमेव स्थानिक उमेदवार म्हणून लढतीत आले असून जि.प. आरोग्य शिक्षण सभापती व भाजपाचे उमेदवार वसंत आंबटकर व स्वभापचे जिल्हा अध्यक्ष मधुसूदन हरणे यांच्याशी कोपुलवार यांची लढत असल्याचे बोलल्या जात आहे.
भाजप उमेदवार आंबटकर व राकाँच्या अर्चना तिमांडे व अपक्ष अंकुश कामडी एकाच समाजाचे असल्याने मत विभाजनामुहे भाजपा उमेदवाराचा विजय अडचणीत असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेचे भारत चौधरीकडे दुर्लक्ष करू नये असाही छुपा सूर ऐकायला मिळत असल्याने विजय नेमका कोणाचा याची बेरीज वजाबाकी करताना मतदार व कार्यकर्ते दिसून येत आहेत.
सावली वाघ जि.प. अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद याच प्रवर्गासाठी राखीव असल्याने या गटातील उमेदवारासाठी आ. समीर कुणावार यांनी प्रतिष्ठा पणाला लावून भाजपा उमेदवार नितीन मडावीला प्रकाशझोतात आणले. त्यामुळे भाजपा उमेदवाराच्या विजयाची एकतर्फा चर्चा असताना स्वभापच्या तुळसीदास मेश्राम यांनी शेवटच्या दिवसात तगडे आव्हान उभे केल्याने भाजपाचा विजय सहज सोपा नसल्याची चर्चा होत आहे. तर शिवसेने रामदास पुरके सुद्धा स्पर्धेत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे भाजपाचाच विजय सांगणे सध्या कठीण आहे.
वाघोली जि.प. गटात राकाँ उमेदवार पं.स. सभापती संजय तपासे यांचा बालेकिल्ला असून भाजपा उमेदवार शरद सहारे यांनी मतदानात तगडी टक्कर दिल्याची चर्चा आहे. या गटात काँग्रेसच्या सुनील काळे यांचे मताधिक्य भाजपाला प्रभावित करणार असल्याची चर्चा आहे. विद्यमान आमदारांनी या गटावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याने तपासे यांचा विजय सहज सोपा नसल्याची चर्चा आहे.
भाजपाचे वसंतराव आंबटकर यांचा गट आता अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव असून या गटात भाजपाच्या जोत्स्ना सरोदे, राकाँच्या विशाखा कांबळे व काँग्रेसच्या प्रतिभा ढोक यांच्यात काट्याची लढत आहे. या गटात भाजपा उमेदवाराची कसोटी लागणार, अशी मतदारांत चर्चा आहे.
भाजपाचा गड अल्लीपूर गट माजी खा. सुरेश वाघमारे यांचे गृह गाव असल्याने तर माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांची पत्नी विभा ढगे याच मतदार संघात उमेदवार असल्याने या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या गटात राकाँच्या पुष्पा सुरेश सातोकर यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे. राकाँच्या सातोकर यांना सिरूड गणासह अल्लीपूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अल्लीपूर गावातील भाजपा व काँग्रेसच्या उमेदवारांचे पारडे हलके झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या गटात भाजपा काँगे्रसची कसोटी लागणार असल्याची चर्चा होत आहे. सद्य:स्थितीत राकाँच्या ताब्यात असलेल्या अनुसूचित जातीसाठी राखीव कानगाव गटात भाजपाचे श्याम शंभरकर, राकाँचे धनराज तेलंग, शिवसेनेचे राजू नंदरे व काँग्रेसचे प्रकाश वाघमारे यांची विजयासाठी चढाओढ असल्याचे चित्र आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विश्वासाचे वातावरण दिसत असले तरी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, कार्यकर्ते आपल्या उमेदवारासाठी आकडे मोड करताना दिसत आहे.
एकंदरीत जि.प. व पं.स. च्या निवडणुकीसाठी मतदान इव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या एकतर्फा विजयाने निवडणूक निकालावर भाष्य करणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. तालुक्यात काट्याची लढत वर्तविली जात असली तरी न.पा. निवडणुकीची पुनरावृत्ती होणार, अशी भाजपा कार्यकर्त्यांची खात्री असल्याने इतर पक्षाचे कार्यकर्ते मात्र सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अशा स्थितीत निर्णयाची प्रतीक्षा मतदारांना करावी लागणार आहे.

Web Title: Seven wrestling clashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.