मोबाईल व टॅबलेटच्या माध्यमातून होणार सातवी आर्थिक जनगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 03:04 PM2019-05-18T15:04:53+5:302019-05-18T15:07:14+5:30
भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने जून महिन्यापासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेटचा वापर करून करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारत सरकार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाच्यावतीने जून महिन्यापासून सातवी आर्थिक जनगणना मोबाईल व टॅबलेटचा वापर करून करण्यात येणार आहे.
सातवी आर्थिक जनगणना आपल्या मोबाईल, टॅबलेटच्या माध्यमातून सुरू होत असून यामध्ये ब्लॉकमधील सर्व घरे, दुकाने आणि लहान मोठे दुकानदार जोडले जाणार आहे. हे संपूर्ण कार्य पेपरलेस राहणार आहे. तसेच सदर योजना आपले सरकार सेवा केंद्राच्यांअंतर्गत येणाऱ्या सेंटर संचालकांनी राबवावयाची आहे. यात कुठल्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घ्यायावी अशा सूचना जिल्हास्तरावर आयोजित कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत.
यामध्ये सीएससी केंद्रचालक सुपरवायझर म्हणून काम पाहणार आहे. तसेच सर्व्हेअर सर्वेक्षण करणार आहे. सुपरवायझर आणि सर्व्हेअर यांना आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अशी माहिती आयोजित कार्यशाळेत देण्यात आली. आर्थिक जनगणना कशी करावयाची याबाबतची माहिती उपस्थित व्हीएलई यांना देण्यात आली.
पेपरलेस काम पहिल्यांदाच होणार
यापूर्वी सहा आर्थिक जनगणनेचे काम पेपरवर करण्यात आले होते. सर्व्हेअर यासंदर्भातील माहिती फिल्डवर फिरून गोळा करून ती सादर करीत असे त्या आधारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश अशी माहिती संकलित होत होती. यावेळी या संपूर्ण जनगणनेचे काम पेपरलेस होणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे राज्याच्या बहुतांश भागात सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे ही माहिती गोळा करून डाटा तयार केला जाणार असल्याचे कार्यशाळेत वर्धा येथे सांगण्यात आले.
सातव्या आर्थिक जनगणनेच्या संदर्भात जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित करून माहिती या कामात सहभागी सर्व घटकांना देण्यात आली आहे. या कामात कुठलीही हयगय होणार नाही यांची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- वैभव देशपांडे,
राज्य समन्वयक, आपले सरकार सेवा केंद्र.