‘सूर’ तीरावरील गावात भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 05:00 AM2022-06-04T05:00:00+5:302022-06-04T05:00:12+5:30

सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी पातळी सध्या खालावली आहे. परिणामी, यंदा सूर गावातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे.

Severe water crisis in a village on the shores of Sur | ‘सूर’ तीरावरील गावात भीषण जलसंकट

‘सूर’ तीरावरील गावात भीषण जलसंकट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : सेलू तालुक्यातील सूर नदीच्या तीरावर वसलेल्या सूरगावात सध्या भीषण जलसंकटाने डोकेवर काढले आहे. ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावात नळ योजना कार्यान्वित करण्यात आली असली तरी ज्या विहिरीतून पाण्याची उचल केली जाते, त्या विहिरीची पाणी पातळी चांगलीच खालवल्याने पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरत आहे. परिणामी, या गावातील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी पातळी सध्या खालावली आहे. परिणामी, यंदा सूर गावातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास या गावातील नागरिकांना शेतशिवारातील विहिरीवरून घागर-घागर पाणी आणावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे सूरगाव परिसरातील चोरीची वाळू सेलू तसेच वर्धा शहरात मनमर्जीने चढ्या दरातच विकली जाते. मध्यंतरी सेलूच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करून वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावला होता. पण सध्या पुन्हा नव्या जोमाने या परिसरात वाळू उत्खनन व वाहतुकीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष
- गावात निर्माण झालेल्या कृत्रिम जलसंकटावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सूर गावातील नागरिकांची आहे. परंतु नागरिकांच्या या मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या गावातील महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याप्रकरणी लक्ष देत नागरिकांची समस्या निकाली काढावी, अशी मागणी आहे.

 

Web Title: Severe water crisis in a village on the shores of Sur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.