'संपकाळात' जिल्हा कचेरीतील 'सेवादूत' केंद्र ठरतेय 'आधारवड'; दीड दिवसांत ६५ तक्रारी प्राप्त
By महेश सायखेडे | Published: March 15, 2023 05:59 PM2023-03-15T17:59:06+5:302023-03-15T18:03:20+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना
वर्धा : संप काळात तक्रार किंवा निवेदन सादर करण्यासह विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा कचेरीत सेवादूत केंद्रात निवेदन व तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची ही संकल्पना संपकाळात नागरिकांसाठी आधारवड ठरू पाहत आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस असलेल्या बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत सेवादूत केंद्राला एकूण ६५ तक्रारी अथवा निवेदन प्राप्त झाली आहेत. या सर्वच तक्रारींचा झटपट निपटारा कसा होईल या दृष्टीनेही प्रत्यक्ष कार्य होत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी म्हणाले... मावशी येथे सादर कर तक्रार
बुधवारी भोजन अवकाश पूर्वीचे कार्यालयीन कामकाज पूर्ण केल्यावर जिल्हा कचेरीच्या पायऱ्या उतरत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नियोजित ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या शासकीय वाहनाजवळ गेले. ते शासकीय वाहनात बसणार एवढ्यात त्यांचे तक्रार घेऊन जिल्हा कचेरीत आलेल्या एका वृद्ध महिलेवर लक्ष गेले. जिल्हाधिकारी कर्डिले यांनीही या मायमाउलीला आपुलकीने विचारपूस करीत मावशी तुमची तक्रार सेवादूत केंद्रात द्या, असे अतिशय नम्रपणे सांगितले. आपले साहेब सामाजिक बांधीलकी जोपासत आहेत, मग मी का मागे राहू असाच काहीसा विचार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने एक पाऊल पुढे टाकत त्या मायमाउलीला सेवादूत केंद्रापर्यंत नेत तिची तक्रार सेवादूत केंद्रात दाखल करून घेतली.
हे सांभाळत आहेत सेवादूत केंद्राची जबाबदारी
संप काळातील दीड दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतील सेवादूत केंद्रात एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्रात तहसील कार्यालयाशी संबंधित तक्रारी सुनील सोमवंशी, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी नलिनी थूल, तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी शीतल सुटे स्वीकारत आहेत.
दीड दिवसातील प्राप्त तक्रारींची स्थिती
जिल्हाधिकारी कार्यालय : ४७
उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय : ०४
तहसील कार्यालय : १४