सेवाग्राम-वर्धा रस्त्याच्या कडा धोकादायक
By admin | Published: February 7, 2017 01:14 AM2017-02-07T01:14:30+5:302017-02-07T01:14:30+5:30
वर्धा ते सेवाग्राम पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुमाचा भरावा देण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते.
मुरुमाचा भरावा देण्याचा विसर : अपघाताची शक्यता
सेवाग्राम : वर्धा ते सेवाग्राम पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुमाचा भरावा देण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. रस्त्याच्याखाली वाहन घेताना काळजी घेतली नाही तर अपघाताचा धोका असतो. रात्रीच्यावेळी येथून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला भरावा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
सेवाग्राम-वर्धा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. रात्री उशिरापर्यंत येथून वाहनांची ये-जा सुरू असते. सेवाग्राम येथे रुग्णालय असल्याने यानिमित्त हा रस्ता सुरूच असतो. या मार्गावरील श्री मारुती देवस्थान ते धन्वंतरी नगर पर्यंतचा रस्ता धोकादायक ठरत आहे. रस्त्याच्या कडा फुटलेल्या असून काही भाग खोलगट झाला आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याचा उंच सखल भाग लक्षात येत नाही. त्यामुळे वाहन घसरुन अपघात होतात.
समोरुन एखादे वाहन भरधाव आल्यास अशात वाहन खाली उतरविणे अत्यंत कठीण होते. ही बाब अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने याची दखल घेत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
प्रशासनाचे दुर्लक्ष
श्री मारूती देवस्थान ते धन्वंतरी नगर पर्यंतचा रस्त्याचा भाग उंच झाला असून येथे मुरूमाचा भरावा देणे गरजेचे ठरत आहे. याच भागात मोठमोठे दगड असल्याने दुचाकी वाहन चालकांना त्रास होतो. वाहन चालक याबाबत संताप व्यक्त करतात.
रात्रीच्या वेळी समोरून आलेल्या वाहनांचा प्रकाश पडल्यावर वाहन चालकांना दिसेनासे होते. अशात रस्त्याच्या खोलगट भाग नजरेस पडला नाही तर दुचाकी घसरुन अपघात होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुला मुरुम भरण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे.