शकुंतलेने विदर्भाचे ‘डेन्मार्क’ ‘कॅलिफोर्निया’शी जुळणार
By admin | Published: August 28, 2016 12:42 AM2016-08-28T00:42:12+5:302016-08-28T00:42:12+5:30
पुलगाव-आर्वी शकुंतला वरूडपर्यंत लांबविल्यास विदर्भाचे ‘कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड परिसर विदर्भाचे ‘डेन्मार्क’ म्हणून
वर्धा : पुलगाव-आर्वी शकुंतला वरूडपर्यंत लांबविल्यास विदर्भाचे ‘कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड परिसर विदर्भाचे ‘डेन्मार्क’ म्हणून नावारूपास आलेल्या महाभारतकालीन आर्वी परिसराशी जोडला जाऊ शकतो. पंचकन्या स्मारक कौंडण्यपूर मार्गाशी जोडता येते. टाकरखेड, गुरूकुंज मोझरी, निम्न व उर्ध्व वर्धा प्रकल्प, पर्यटन, औद्योगिक विकास, बेरोजगारी आदी फायदे या मार्गाच्या विकासामुळे होऊ शकतात, असे मत विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास समितीचे बाबासाहेब गलाट यांनी व्यक्त केले.
रोहणा, विरूळ व पुलगाव येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, राष्ट्रीय स्मारक म्हणून नावारूपास येऊ पाहणारे आष्टी (श.) गावालाही रेल्वे मार्गावर येण्याचे भाग्य लाभू शकते. संरक्षण खात्याचे पुलगाव, आमला व इटारसी हे तीनही अॅम्युनेशन डेपो जोडले गेल्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेलाही लाभ होऊ शकतो. ‘क्लिक्स अॅण्ड निक्सन’ कंपनीच्या ताब्यातील आर्वी-पुलगाव व यवतमाळ-मुर्तीजापूर, अचलपूर हे दोन्ही शंकुतला नॅरोगेज रेल्वेमार्ग जुलै २०१६ पासून मुक्त झाले. याबद्दल विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास कृती समितीने शासनाचे आभार मानले. समितीने विकासाची मागणी केली होती. यातील एक मार्ग जुलै महिन्यात मार्गी लागला. दुसऱ्या मार्गासाठी १०० किमी रेल्वे मिशन आर्वीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खा. रामदास तडस यांनी लोकसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. मनोहर पर्रिकर व सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पास मंजुरी द्यावी. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, संस्था, सामाजिक संघटना यांनी रेल्वे मिशनला सहकार्य करून गती द्यावी. मिशनने सह्यांची मोहीम सुरू केली. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. मिशनद्वारे भविष्यात केल्या जाणाऱ्या आंदोलनात पुलगाव ते वरूडपर्यंतच्या नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही गलाट यांनी केले. सभेला तीनही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)