न्यायासाठी वर्धेत शांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:56 PM2018-04-20T23:56:45+5:302018-04-20T23:56:45+5:30
कश्मीर राज्यातील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सदर विकृत प्रवृत्तीच्या विरोधात शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांती मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कश्मीर राज्यातील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सदर विकृत प्रवृत्तीच्या विरोधात शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांती मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला-पुरुष व मुल-मुली सहभागी झाले होते.
परिवर्तनवादी सामाजिक संघटना समन्वय समिती, कौमी एकता मंचच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या शांती मोर्चात सहभागी होण्यासाठी दुपारी १.३० वाजता महिला-पुरुष व मुला-मुलींसह तरुण-तरुणींनी बजाज चौक येथे एकत्र आले. स्थानिक बजाज चौक येथून दुपारी ३ वाजताच्या सुमारास निघालेल्या या मोर्चाने सोशालिस्ट चौक, बडे चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण करीत सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सदर शांती मोर्चाला पोलिसांनी न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविल्यावर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
मोर्चात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय इंगळे तिगावकर, तुषार देवढे, माजी नगर सेवक सलीम कुरेशी यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, अण्णाभाऊ साठे कलामंच, अध्ययन भारती, आधार संघटना, आयटक अंगणवाडी सेविका संघटना, आॅल इंडिया डेमोक्रेटीक युथ, आॅर्गनायझेशन, आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन, आॅल इंडिया मुस्लीम स्टुडंटस आदी विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
चार चिमुकल्यांनी केले मोर्चाचे नेतृत्त्व
एवढ्या मोठ्या संख्येत निघालेल्या या मोर्चाची धुरा चार चिमुकल्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. एकूणच चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात चिमुकलेही शांत बसणार नाही, हेच त्यांच्यावतीने सांगण्यात येत होते.
ठिकठिकाणी केली होती पाण्याची व्यवस्था
मोर्चात सहभागी जनसमुदायाला तपत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी शांती मोर्चा जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
पोलिसांची दमछाक
ज्या मार्गाने सदर शांती मोर्चाने मार्गक्रमण केले त्या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाने इतर मार्गाने वळती केली होती. तपत्या उन्हात वाहतूक वळती करण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती.