जगाला शांतता देणाऱ्या गांधी जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, शरद पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:14 PM2023-02-13T12:14:48+5:302023-02-13T12:17:00+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्कस मैदानात निर्धार मेळावा

Sharad Pawar accuses the government of neglecting the development of 'Gandhi' Wardha district which gives message of peace to the world | जगाला शांतता देणाऱ्या गांधी जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, शरद पवार यांचा आरोप

जगाला शांतता देणाऱ्या गांधी जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष, शरद पवार यांचा आरोप

googlenewsNext

वर्धा : वर्धा जिल्ह्याने जगाला शांतीचा संदेश दिला आहे. गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे विचार समजून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक वर्ध्यात येण्यास उत्सुक आहेत. मात्र, गांधी जिल्ह्याच्या विकासाबाबत राज्य आणि केंद्र सरकार उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाहीत. खते, औषधे, बियाण्यांच्या किमती निश्चित करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळेल. मात्र, सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील रामनगर परिसरात असलेल्या सर्कस मैदानात निर्धार मेळाव्याचे रविवारी १२ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्या चव्हाण, डॉ. आशा मिरगे, डॉ. सुरेखा देशमुख, सक्शना सलगर, माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, ॲड. सुधीर कोठारी, सलील देशमुख, दिवाकर गमे, संदीप किटे, अतुल वांदिले, सुनील राऊत, समीर देशमुख आदींची उपस्थिती होती.

खासदार पवार पुढे म्हणाले की, राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत चारही जागांवर भाजपचा पराभव झाला. यावरून राज्यातील नागरिकांच्या मनात सध्याच्या सरकारबद्दल नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र व राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. राजकीय विचार आणि पक्ष बदलल्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागला, पण अनिल देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. त्यांच्या जवळच्या लोकांवर १३० छापे टाकण्यात आले, पण देशमुख हे डगमगले नाहीत. वेळ आल्यावर सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली पाडणे, ही जनतेची जबाबदारी आहे. तरुणांचीही अवस्था फार बिकट झाली आहे. नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. सध्या सत्तेचा फक्त गैरवापर सुरू असून हे रोज मी दैनंदिन जीवनात बघत आहे. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्याचा उपयोग लोकांचं दु:ख दूर करायचं असते, याची साधी आठवणही राज्यकर्त्यांना नाही,अशी टीकाही त्यांनी यावेळी निर्धार मेळाव्यातून सरकारवर केली. लोकांनी ठरवले आहे की, महाराष्ट्राचं परिवर्तन घडवू, संधी आल्यावर त्यांना जागा दाखवायची आहे, असा निर्धार खासदार शरद पवार यांनी केला.

सुरेश देशमुख यांनी आमच्यात नव्या-जुन्याचा वाद नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही प्रबळ आहे हे दाखवून एकजुटीने निवडणुका लढू, असे सांगितले. सुबोध मोहिते पाटील यांनी समाजातील शांती बिघडविण्याचे काम आताचे सरकार करीत आहेत. मुळात सबका साथ सबका विकास हा नाराच चुकीचा असून केवळ विशिष्ट समाजाचाच विकास करण्याचे काम हे सरकार करीत आहेत. महागाईविरोधात कुणीही बोलत नाही. आमचा पक्ष गांधी विचारांवर चालणार आहे. येत्या निवडणुकीत निवडून येत हे सिद्ध करू दाखवू, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. आशा मिरगे, प्राजक्त तनपुरे, सक्शना सलगर, डॉ. सुरेखा देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अतुल वांदिले यांनी केले.

१४ महिने सरकारने माझा छळच केला : अनिल देशमुख

माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, कुठलेही कारण नसताना मला १४ महिने तुरुंगवास भोगावा लागला. खरे तर माझा एकप्रकारे छळच सरकारने केला. १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जे न्यायालयात १ कोटी ७१ लाखांवर पोहोचले, पण जेव्हा आरोप सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा सरकारकडे एकही पुरावा नव्हता. त्यामुळे सत्याचा विजय झाला. २०२४ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून राज्यातील राजकारणाचे वेगळे चित्र साकार करायचे आहे. वर्ध्यात २ आमदार आणि १ खासदार मिळावे म्हणून प्रयत्न करू, पुढे वाटाघाटीत ज्या जागा मिळतील त्या सर्व निवडून आणण्याचा प्रयत्न करृ, असा निर्धार यावेळी अनिल देशमुख यांनी केला.

पंतप्रधानांना भेटायला मी तुमच्या सोबत येतो; खा. पवार यांचा व्यापाऱ्यांशी संवाद

वर्धा येथील दुर्गा चित्रपटगृहा नजीकच्या सभागृहात संयुक्त व्यापारी समितीच्या वतीने व्यापारी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार शरदचंद्र पवार यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत तुम्ही चार जण निवडा पंतप्रधानांना भेटायला मी तुमच्या सोबत येतो, मी पंतप्रधानांशी बोललो तर ते नाही म्हणणार नाही, असे म्हणत व्यापाऱ्यांना आश्वस्त केले. व्यापाऱ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यातले ७० टक्के प्रश्नांशी माझा संबंध येत नाही. काही राज्य सरकारशी तर काही स्थानिक प्रशासनाशी संबंधित आहे. व्यापारी आपल्या प्रश्नांबाबत जागृत आहे. यावरून वर्ध्याच्या लोकांमध्ये जनजागृती दिसून येते. शहराची जागा महसूलची असावी असं तुम्ही सांगितल्यावरून दिसते हा विषय महाराष्ट्राच्या महसूल विभागाशी संबंधित आहे. मी ज्यांच्याकडे महसूल खाते आहे त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांना याबाबत सांगतो. नागपूरपासून वर्धा इतक्या जवळ असतानाही नझूलचा विषय त्यांच्या कां लक्षात आला नाही, हा आश्चर्याचा विषय आहे. सेवाग्राम व पवनारला ऐतिहासिक वारसा आहे. परदेशातही महात्मा गांधींच नाव घेतले जाते. सेवाग्रामच्या विकासासंदर्भात पंतप्रधानांना भेटायला आणि निमंत्रण द्यायला कोण येणार हे तुम्ही ठरवा. मी तुमच्यासोबत येतो, असे ते म्हणाले.

Web Title: Sharad Pawar accuses the government of neglecting the development of 'Gandhi' Wardha district which gives message of peace to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.