शरद पवारांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 05:08 PM2017-11-18T17:08:34+5:302017-11-18T17:18:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (18 नोव्हेंबर) सकाळी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बंद दारा आड चर्चा झाली.
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (18 नोव्हेंबर) सकाळी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बंद दारा आड चर्चा झाली. या चर्चेचा अधिक तपशील मिळू शकला नसला तरी शरद पवार मागील चार दिवसांपासून विदर्भाच्या दौ-यावर असल्याने या संदर्भात पाटील यांनी पवारांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे.
चंद्रकांत पाटील शुक्रवारी (17 नोव्हेंबर) रात्री 11 वाजता विश्रामगृहात पोहोचले. त्यानंतर शनिवारी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची आढावा बैठक घेतली. शिवाय जिल्ह्यातील अनेक नागरिकांची निवेदनेही स्वीकारली. सकाळी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच विश्रामगृहात मुक्कामी असल्याने दोघांचीही भेट झाली. यावेळी पाटील यांनी शरद पवारांशी दीर्घकाळ चर्चा केली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सत्ताधारी पक्षाचे लोकही चार दिवसांत आपल्याला भेटले.
आपण त्यांना शेतक-यांच्या प्रश्नाबाबत बोललो, पण त्यांनी आमच्या लोकांना शेतीचे काही कळत नाही, असे सूचक उत्तर दिल्याचे जाहीर सभेत सांगितले. एकूणच 4 दिवसांच्या पवारांच्या दौ-याचा परामर्श चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच दरम्यान खासदार रामदास तडस यांचीही शरद पवारांशी भेट झाली, असे समजते.