जिल्हा बॅँकेच्या मुद्यावर शरद पवारांचे मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:14 PM2017-11-18T23:14:01+5:302017-11-18T23:15:45+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी वर्धा येथे कार्यकर्ता मेळावा झाला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी वर्धा येथे कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर सुरेश देशमुख यांनी खा. पवार यांना वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमुळे निर्माण झालेल्या संकटाने पक्ष विस्तार जिल्ह्यात विस्कळीत झाला आहे. या संकटातून आपणच आम्हाला वाचवू शकता व त्यासाठी प्रयत्न करा, अशी कळकळीची विनंती केली. मात्र संपूर्ण भाषणात शरद पवार यांनी समीर देशमुखांच्या या मुद्यावर कमालीचे मौन बाळगले. याची संपूर्ण सभास्थळी चर्चा होती. शरद पवारांचे हे मौन व भाषणात त्यांनी वर्धा जिल्ह्यात पक्ष संघटन वाढविताना विविध जाती, धर्माच्या लोकांना एकत्रित जोडा, हा दिलेला संदेश विद्यमान जिल्हा नेतृत्वाला बरेच काही सांगून जाणारा आहे.
स्थानिक यमुना लॉन या मेळावास्थळी सकाळी ११.३० वाजता शरद पवार यांचे आगमण झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, वर्धा जिल्हा निरीक्षक आ. ख्वाजा बेग, माजी मंत्री वसुधा देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख, संदीप बाजोरिया, वसंतराव कार्लेकर, प्रा. राजू तिमांडे, किशोर माथनकर, ईश्वर बाळबुधे, सुरेखा ठाकरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने शरद पवार यांचा मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी केले. राऊत यांनी २०१४ नंतर राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकºयांची व सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होत आहे. शेतकºयांना संकटातून वाचविण्यासाठी आपण पुढाकार घ्या, अशी मागणी पवार यांच्याकडे केली. त्यानंतर रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून आमचे कुटूंब पक्षाशी प्रामाणिक आहे. अनेक लोक पक्ष सोडून गेलेत; मात्र आम्ही कुठेही गेलो नाही. साहेब आमची आपल्यावर श्रद्धा आहे. सुरेशभाऊंच्या प्रकृतीमुळे काही काळ काम थांबले असले तरी पुन्हा त्याच जोमाने कामाला लागलो आहे. २००९ च्या निवडणुकीत अपक्षरित्या आम्ही निवडणूक जिंकली; पण याच दरम्यान जिल्हा सहकारी बॅँकेचा प्रश्न निर्माण झाला. लोकांचे ९२ कोटी रुपये बॅँकेने परत केले. मी स्वत: अध्यक्ष पदावर होतो. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत स्वबळावर पक्ष लढला; पण आम्हाला गावा-गावात जावून प्रचार करता आला नाही. लोकांनी तुम्ही आमच्याकडे येऊच नका, असे स्पष्ट सांगितले. जेथे आम्ही जात होतो, तेथे बॅँकेचे पासबुक घेवून लोकांना विरोधक पाठवित होते. गाड्या भरून लोक बॅँकेवर पैशासाठी येत होते. या साºया परिस्थितीने आम्हाला हतबल केले. या संकटातून आपणच आम्हाला वाचवू शकता, अशी कळकळीची विनंती शरद पवारांना केली.
माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. शरद पवार साहेबांनी विदर्भावर लक्ष केंद्रीत केले, ही अतिशय चांगली गोष्ट झाली. विदर्भच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रत आणून देऊ शकतो, असे सांगितले. शिवाय पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना नमस्कार घ्यायला तयार नाही. आपल्यासारखी सर्वांची मानसिकता तयार करा. साहेब, आम्ही सज्ज आहो, असे सांगितले. त्यानंतर आ. ख्वाजा बेग यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व शरद पवारांच्या चार दिवसीय दौºयाचा आढावा मांडला.
माजी आमदार सुरेश देशमुख यांनी आपण १९९२-९३ पासून राजकारणात आहो. वर्धा जिल्हा प्रत्येकवेळी लाटेवर चालतो, असे सांगितले. १९८० मध्ये इंदिरा लाट तर २०१४ मध्ये मोदी लाटेत आम्ही पराभूत होऊन गेलो. माझ्या वाट्याला सतत निवडणुकीत अपयश आले. अखेरीस लोकांनी माझ्या अपयशाला कंटाळून एकदा संधी दिली. पुन्हा एकदा विदर्भात आपली लाट आणा व आम्हाला निवडून आणा, असे प्रतिपादन केले. त्यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र व राज्यातील सरकारच्या धोरणावर टीका करून जनतेने केलेली चूक जनतेच्या लक्षात आली आहे, असे सांगितले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे यांनी केले तर आभार समीर देशमुख यांनी मानले.
दत्तांचा उल्लेख आणि हास्य फुलले
माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी आपल्या भाषणात ‘दत्ता’ एवढा उल्लेख अनावधानेने केला व सभेत उपस्थितांसह सर्वत्र हास्य पसरले. याचा धागा पकडत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जेथे सत्ता तेथे दत्ता, असा उल्लेख केला. उपस्थित लोक काय ते समजून गेले.
सरकारवर घणाघाती टीका
विद्यमान सरकारचे धोरण शेतकºयांबाबत अनुकूल नाही. शेतकºयांना लाभ झाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. त्या दृष्टीने निर्णय होण्याची आवश्यकता आहे; पण सरकार याबाबत निष्क्रीय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सरकारी व सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत सरकारने कोणतीही समिती गठित केलेली नाही. या समितीच्या प्रमुखांची आपल्याशी चर्चा झाली. त्यांनी अशा प्रकारची कोणतीही पाचले उचलली जाणार नसल्याचे सांगितल्याचे खा. पवार यांनी पात्रपरिषदेत बोलताना सांगितले. केंद्र व राज्य सरकारविरूद्ध प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांना कमी दर्जाचे बियाणे देण्यात आले. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला, असे चित्र विदर्भात दिसल्याचेही पवार म्हणाले, मुख्यमंत्री आपला सल्ला घेऊन सरकार चालवितात व निर्णय घेतात, असे सांगतात, असे विचारल्यावर मला याबाबत काहीही माहिती नाही, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. कर्ज माफीच्या जाहिराती अत्यंत खोट्या आहेत. कुणाचाही खात्यात पैसे जमा झाले नसल्याचेही ते म्हणाले.
अनिल देशमुखांच्या हाताला अटॅक
भाषण देत असताना माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या डाव्या हाताला प्रचंड वेदना झाल्या. कदाचित डिसलोकेशनमुळे हा प्रकार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना मंचावरून खाली नेण्यात आले. कार्यकर्ते व एका डॉक्टरने त्यांच्यावर उपचार केले व ५ ते ७ मिनीटानंतर पुन्हा ते मंचावर विराजमान झाले.
वर्धा बाजार समितीकडून शरद पवारांचा सत्कार
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, त्यांचे संचालक मंडळ व सहकाºयांनी शरद पवार यांचा मंचावर जाऊन सत्कार केला. संचालनकर्त्याने सेलू बाजार समितीचा उल्लेख केल्याने पत्रकारांना संचालनकर्त्याला चूक लक्षात आणून द्यावी लागली. त्यानंतर संचालनकर्त्याने श्याम कार्लेकर यांचा नामोल्लेख केला.
महिला राकाँकडूनही पवारांचा सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शरयू वांदिले, पिपरीच्या सरपंच कुमूद लाजूरकर, शारदा केने, प्रियंका देशमुख, विना दाते, स्वाती देशमुख, माधवी साबळे, शोभा पवार आदी महिला उपस्थित होत्या. सभास्थळी पोहोचण्यापूर्वी रायुकाँच्या कार्यकर्त्यांनी समीर देशमुख यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढून पवारांना सभास्थळी पोहोचविले.
पवारांच्या भाषणाला भारनियमनाचा फटका
शरद पवार यांचे भाषण सुरू असताना मधेच बत्ती गुल झाल्याने माईकसमोर त्यांना शांत उभे राहावे लागले. जनरेटर सुरू होताच पुन्हा पवारांचे भाषण सुरू झाले. पाच मिनिट ही स्थिती होती.