फळीवरची भांडी मोजायला लावत तिने सुरू ठेवले आहे मुलाचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:31 AM2020-09-26T10:31:34+5:302020-09-26T10:32:54+5:30
कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षणाची आस असलेल्या मातेने घरातच आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. हिंगणघाट तालुक्यातल्या लाडकी या गावातील प्रतिभा भास्कर बुरिले या महिलेने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कंबर कसली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षणाची आस असलेल्या मातेने घरातच आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. हिंगणघाट तालुक्यातल्या लाडकी या गावातील प्रतिभा भास्कर बुरिले या महिलेने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कंबर कसली आहे.
नैतिक भास्कर बुरीले हा मुलगा मागच्या वर्षी वर्ग 2 री मध्ये होता तेव्हा शाळेमध्ये माता सभा झाली होती. प्रथम शिक्षण उपक्रम संस्थेमार्फत गेल्या काही वर्षात मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा याकरिता गावागावात माता सभा घेण्यात आल्या होत्या. मुलासोबत मातांनाही काही वर्कशीट देण्यात आल्या होत्या. त्या वर्कशीट आठवड्यानुसार मुलांकडून माताना सोडवून घ्यायच्या होत्या.
याचा एक अनुभव म्हणून लाडकी येथील माता सौ. प्रतिभा भास्कर बुरीले या माता शाळेत घेतलेल्या सभेला नेहमी उपस्थित असायच्या. शाळेतील शिक्षिका यांच्या उपस्थित या सभा घेण्यात येत होत्या. सभेमध्ये मातांना सांगितलं की आपण आपल्या मुलाला वेळातला वेळ काढून कस शिकूवू शकतो. मुलाला कस बोलकं केल पाहिजे अशा चर्चा करण्यात आल्या होत्या. नैतिकच्या आईने आपल्या मुलाला स्वयंपाक करता वेळी घरातल्या वस्तू मोजायला लावते, पाटीवरचे भांडी मोजायला लावते व त्याचे गणित पक्के करण्याचा प्रयत्न करते.
त्यांची परिस्थिती खुप नाजूक आहे. ती घरातून एकटीच कमवते त्यामुळे ती मुलाला शिकवणीसाठी कुठे पाठवू शकत नाही. मागच्या वर्षी तो सोपे सोपे शब्द वाचायचा आता मात्र नैतिक सरळ वाक्य वाचतो. लॉकडॉऊनपासून मुलाला ती घरीच बसून मुलाच वाचन व रोज नवनवीन गोष्टी सांगते. कोविड19 मुळे शाळा बंद असल्या तरी माझ्या मुलाचं शिक्षण थांबलं नाही आहे असे ठाम मत या मातेने मांडले आहे.