‘ओरेगामी’साठी पत्रकांचा आधार
By admin | Published: October 12, 2014 11:49 PM2014-10-12T23:49:23+5:302014-10-12T23:49:23+5:30
प्रचाराचा केवल एकच दिवस उरला आहेत. त्यानंतर छुपा प्रचार सुरू होईल. आपले नाव चेहरा सर्वांच्या समोर सतत असावे यासाठी कागदी पॅम्प्लेट्सवर फोटो, चिन्ह आणि मजकूर छापून आपाल्यालाच
वर्धा : प्रचाराचा केवल एकच दिवस उरला आहेत. त्यानंतर छुपा प्रचार सुरू होईल. आपले नाव चेहरा सर्वांच्या समोर सतत असावे यासाठी कागदी पॅम्प्लेट्सवर फोटो, चिन्ह आणि मजकूर छापून आपाल्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाते. मतदार याकडे तितकेसे लक्ष देत नसले तरी मुलांसाठी मात्र हा काळ पर्वणी ठरत असतो. कागदी वस्तू(ओरेगामी) बनविण्यासाठी मुलांना आयते चांगले कागद मिळत असल्याने बच्चेकंपनी निवडणूक काळात खुश असते.
प्रचार पत्रके म्हणजेच पॅम्प्लेट्स हा प्रत्येकच उमेदवाराच्या प्रचाराचा अविभाज्य भाग झाला आहे. घरोघरी प्रचार करताना उमेदवार आपले प्रचार पत्रक मतदाराला देऊन काका, दादा, ताई आपल्याकडे लक्ष द्या असे म्हणत असतात. या पत्रकाकडे घरची मंडळी तितकी लक्ष देत नसली तरी घरच्या मुलांचे लक्ष केवळ या पत्रकांकडे असते. पत्रक मिळताच मुले त्यापासून विमान, नाव आणि इतरही वस्तू बनविण्याचा सपाटा सुरू करतात. प्रचाराच्या गाड्यांमधूनही अशी प्रचारपत्रके वाटली जातात. ती जास्तीत जास्त आपल्याला मिळावी यासाठी लहान मुलाची धडपड सुरू असते. त्यामुळे गाडी येताच पत्रके मिळण्यासाठी गाडीच्या मागे धावताना मुले दिसत आहे. कागदाच्या वस्तू बनविण्याचा छंद मुलांना असतोच. त्यामुळे निवडणूक त्यांच्यासाठी पर्वणी ठरत आहे.(शहर प्रतिनिधी)