शहराला आले गोठ्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:28+5:30
बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील विविध रस्त्यांवर जनावरांकडून अघोषित ‘रास्तारोको’ केला जात असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडत असून रहदारी असुरक्षित झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रक पोलिस शाखेचे सोईस्कर दुर्लक्ष आहे.
पावसामुळे निर्माण होणारे चिखलमय वातावरण म्हणून पावसाळ्यात दरवर्षीच पाळीव, मोकाट जनावरे शहरातील महत्त्वपूर्ण आर्वी नाका चौक, आरती चौक, धुनिवाले चौक, आर्वी मार्ग, शहरातून जाणारा एकमेव प्रमुख मार्ग आदी ठिकाणी दररोज जनावरांचे कळप रस्त्यावर असतात. एकावेळी १५ ते २० व त्यापेक्षा जनावरे रस्त्यावर, चौकात उभी राहत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागत आहे. यात सांडही राहत असल्याने बऱ्याचवेळा जनावरांच्या टक्कर होतात. ठाकरे मार्केटसमोरील व आर्वी मार्गावर हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही. या जनावरांना ते पहाटेच गोठ्याबाहेर काढतात. ही जनावरे थेट शहर गाठत विविध ठिकाणी ठाण मांडून बसतात. वाहनचालकांनी हॉर्न वाजवूनही ती जागची हलत नाहीत. यापूर्वी या मोकाट, पाळीव जनावरांमुळे अनेक अपघात झाले आहेत.मोकाट, पाळीव जनावरांचा बंदोबस्त करून दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेचा अधिकार असताना, हा विभागही झोपेत आहे. त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही.
पाच-दहा कि.मी. च्या परिघात हजारावर जनावरे
शहरातील पाच-दहा किलोमीटरच्या अंतरात दररोज हजारावर जनावरे ठाण मांडून बसत आहेत. यामुळे वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहेत. निम्म्या रस्त्यावर जनावरांचा कब्जा, याचवेळी विरुद्ध दिशेने मोठे वाहन आल्यास दुचाकीचालकांना वाट कोठून काढावी, असा प्रश्न पडतो. मोकाट जनावरांचा पालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांंनी केली आहे.
वाहतूक पोलिस दंडवसुलीत व्यस्त
वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांची आहे. असे असताना शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलिस शोधूनही सापडत नाहीत. जेथे कर्तव्यावर आहेत, तेथे वाहतूक सुरळीत करण्याचे काम न करता केवळ दंडवसुलीत मग्न असतात.
जनावरांची धरपकड मोहीम नाहीच
मोकाट जनावरे आणि श्वानांनी शहरात हैदोस घातला असताना पावसाळा संपत आला तरी पालिकेकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. गतवर्षी पालिकेने जनावरांची धरपकड करून पशुपालकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी मात्र, नगरपालिकेचा संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. एखाद्या अपघाताची पालिकेला प्रतीक्षा असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अभियंता नीरज पाबळे यांनी व्यक्त केली.