शेवंतीने शेतकऱ्यांचे जीवन फुलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:26+5:30
संजय चोपडे रा. नागाझरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे १३ एकर शेती आहे. त्यामध्ये गहू, संत्रा, टमाटर, मिरची, वांगे इतर नियमित पीक ते घेतात. या पिकांमधून पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने त्यांनी यावर्षी शेवंतीची लागवड केली. सव्वा एकरात त्यांनी जवळपास १२ हजार रोपे लावली असून त्यांची जोपासनाही केली. नवरात्रीपासून फुले निघायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ३० रुपये प्रतीकिलो भाव मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पारंपरिक शेतीपिकातून नफा तर सोडा लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कारंजा (घाडगे) तालुक्यातील नागाझरी येथील शेतकऱ्याने पीक पद्धतीच बदलविली. त्यांनी शेतात शेवंतीची लागवड करुन झाडांची जोपासना करीत पहिल्याच वर्षी सव्वा एकरात खर्च वजा जाता सहा लाखांचा निव्वळ नफा मिळविला. त्यामुळे त्यांचा या पिकांवर विश्वास बसल्याने शेवंतीची लागवड वाढविली. बघता-बघता शेवंतीमुळे शेतकऱ्याचे जीवनमान आता फुलायला लागले आहे.
संजय चोपडे रा. नागाझरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे १३ एकर शेती आहे. त्यामध्ये गहू, संत्रा, टमाटर, मिरची, वांगे इतर नियमित पीक ते घेतात. या पिकांमधून पाहिजे तसा मोबदला मिळत नसल्याने त्यांनी यावर्षी शेवंतीची लागवड केली. सव्वा एकरात त्यांनी जवळपास १२ हजार रोपे लावली असून त्यांची जोपासनाही केली. नवरात्रीपासून फुले निघायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ३० रुपये प्रतीकिलो भाव मिळाला. त्यानंतर त्यांनी २५० रुपये प्रतीकिलोपर्यंत भाव घेतला. या सव्वा एकरातून १२ टन फुले निघाली असून यातून त्यांना जवळपास ९ लाख ५० हजार रुपये मिळाले. लागवड, मजुरी व वाहतूक असा त्यांना अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला. हा खर्च वजा जाता त्यांना सहा लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळाला. यासोबतच त्यांनी त्यांनी दहा गुंठ्यामध्ये नर्सरी तयार करुन त्यात शेवंतीच्या विविध प्रकराची रोपे तयार केली. त्यांना वाढवून ती रोपेही शेतकऱ्याना विकून त्यातून सात लाखाचा निव्वळ नफा मिळविला. शेतकरी संजय चोपडे यांनी वर्षभरात १३ लाखांचा निव्वळ नफा मिळवून नवा आदर्श निर्माण केला आहे.
नागपूरच्या बाजारपेठेचा आधार
सव्वा एकरात फुलशेती केली असून त्यामध्ये शेवंतीची लागवड करण्यात आली आहे. पिवळा, परपल व पांढऱ्या रंगाची फुले असल्याने बाजारपेठेतही चांगली मागणी आहे. नागपुरची बाजारपेठ जवळ असल्याने येथे फुलांना चांगला दरही मिळत आहे. सध्या संजय चोपडे यांनी विक्रीकरिता विविध प्रकारच्या शेवंतीचे रोपटे तयार केले आहे. ही रोपटे चांगल्या पद्धतीने तयार करुन ते शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
झेंडूच्या शेतीतूनही मिळविला नफा
यावर्षी शेवंतीची लागवड करण्यापूर्वी संजय चोपडे यांनी पाच ते सहा एकरात कलकत्ता झेंडूचीही लागवड केली होती. झेडूला फारसा भाव मिळाला नसला तरीही त्यांनी बाजारपेठेतील तेजी-मंदीच्या काळात दरवर्षी दोन ते अडीच लाखांचा नफा मिळविला आहे. मात्र, शेवंतीची शेती त्यांना मोठा लाभ मिळवून देणारी ठरली आहे.
शेवंतीची रोपे साताऱ्यातून विकत आणून यावर्षी लागवड केली होती. फुल विक्री आणि नर्सरीमधून जवळपास १३ लाखांचा नफा मिळाला. सध्या झेंडूची व शेवंतीची रोपे तयार असून एप्रील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली जाईल. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना शेवंतीचे रोपही पुरविले जातील.
संजय चोपडे, शेतकरी