सेवाग्राममधील आश्रमातल्या कुटींना शाकारणारे शिंदोल्यांचे झाड झाले दुर्मिळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 12:41 PM2019-09-13T12:41:59+5:302019-09-13T12:53:49+5:30
आश्रमातील कुटींना शाकारण्यासाठी तसेच बसावयास चटया बनवण्यासाठी उपयोगी पडणारे शिंदोल्याच्या झाडांचे प्रमाण कमी झाल्याने येथील शाकारणीत अडचणी उद्भवत आहेत.
दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम: आश्रमातील कुटींना शाकारण्यासाठी तसेच बसावयास चटया बनवण्यासाठी उपयोगी पडणारे शिंदोल्याच्या झाडांचे प्रमाण कमी झाल्याने येथील शाकारणीत अडचणी उद्भवत आहेत.
सेवाग्राममध्ये एकेकाळी फार मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे होती. या झाडाच्या फांद्यांचा वापर करून अनेक वस्तू बनवल्या जात. महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रमाच्या निर्मितीत या झाडाच्या फांद्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. त्यापासून चटया, आसन, झाडू व शाकारणीची कामे केली जात. दीर्घकाळ टिकणाऱ्या या पानांमुळे उष्णतेचाही त्रास कमी होत असे.
मात्र अलीकडे या झाडाची लागवड नसल्याने व त्याचा वापर अधिक झाल्याने झाडांचे प्रमाण घटत चालले आहे. या आश्रमात येणारे देशविदेशचे पाहुणे, राष्ट्रीय नेते याच चटयांवर बसत.
जिल्ह्यात या झाडांची संख्या कमी झाल्याने या झाडाच्या फांद्यांपासून बनवण्यात येणाºया वस्तूंचे कारागीरही कमी झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून अशा प्रकारच्या चटया मागवण्यात आल्या होत्या.
शिंदोल्यांची झाडे कमी होत आहेत. चटया व झांज्याची गरज सदैव असल्याने आश्रमच्या शेतात शिंदोल्यांची झाडे लावण्याची बाब विचाराधीन आहे.
टी. आर. एन. प्रभू
अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.
आता झाडेच नसल्याने उपाय योजना करणे आवश्यक आहे.