आता पाच रुपयांत मिळणार शिवभोजन थाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:11+5:30
सरकारकडून शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना आता केवळ पाच रुपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भोजन उपलब्ण होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दैनंदिन कामकाजावरच अवलंबून असणाऱ्यांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच अनेकांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे. अशा मंडळींना आता सहज जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने आठही तालुक्यात १ एप्रिलपासून शिवभोजन थाळींची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावरुन १ हजार व्यक्तींची पाच रुपयांत भूक भागविली जाणार आहे.
सरकारकडून शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना आता केवळ पाच रुपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भोजन उपलब्ण होणार आहे. राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत. संसर्गातून होणाऱ्या या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे.
त्याअंतर्गत देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. परंतु, या काळात हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. त्यासोबतच बाहेरगावावरून आलेल्यांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने गरिब नागरिकांसाठी सुरु केलेल्या शिवभोजन थाळींचे लक्षांक प्रतिदिवशी ४०० वरून १ हजार केला आहे. त्यातील ४०० थाळी अगोदरच वर्धा शहरातील रेल्वे स्टेशन समोर, सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्हा न्यायालयासमोर शिवभोजन केंद्रावर सुरु आहे.
आता उर्वरित ६०० थाळींचे विभाजन आठही तालुक्याकरिता करण्यात आले आहे. त्यामध्ये वर्धा (ग्रामीण), सेलू, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर या तालुक्यात प्रत्येकी ७५ थाळींची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतचे तालुकास्थळावर आदेश देण्यात आले आहे.
आता थाळीऐवजी मिळणार पॅकेट्स
शिवभोजन थाळी योजनंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर असल्यामुळे शासन व वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञ नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करीत आहे. परिणामी शासनाने थाळी ऐवजी आता शिवभोजन पॅकेट्स स्वरुपात विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
भोजनालयातही सोशल डिस्टन्सिंग
शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतूक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी जेवण तयार करण्याआधी हात कमीतकमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतूक करुन घेणे, भोजन तयार करणाºया तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेण्याच्याही सूचना केल्या आहे.