शिवसैनिकांची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:19 AM2017-08-05T01:19:19+5:302017-08-05T01:20:02+5:30
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपाने नागरिकांना अनेक आश्वासने देत भूल घातली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपाने नागरिकांना अनेक आश्वासने देत भूल घातली. आता या आश्वासनांच्या पूर्ततेचा विसर त्यांना पडल्याचा आरोप करीत शिवसैनिक जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी शिवसेनेच्यावतीने भाजपाला त्यांनी दिलेल्या आश्वासन पाळण्याकरिता साकडे घालत तसे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
ठाकरे मार्केट परिसरातील शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात शेकडो शिवसैनिक आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. सदर मोर्चा सोशालिस्ट चौक मार्गे व्यापारी लाईन, डॉ. आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाला पंचायत समितीच्या प्रवेश द्वाराजवळ अडविण्यात आले. येथून एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत मागण्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनात सिंदी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट लवकरात लवकर पूर्ण करावा, स्थानिक उद्योगात शासनाच्या नियमाप्रमाणे ८० टक्के जागा स्थानिकांना देण्यात याव्या, ब्रेकडाऊनच्या नावावर होणारे भारनियमन कमी करावे, सिलिंडरधारकांना अनुदानित केरोसीन मिळावे, पुलगाव शहराला तहसीलचा दर्जा देण्यात यावा, शेतकºयाचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमुक्ती द्यावी, सिंचनाचे नियोजन वेळेपुर्वीच करावे, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत करावी, तसेच पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित प्रकरणे मार्गी काढावी आदी मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चात शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, महिला आघाडी प्रमुख सुधा शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजेश सराफ, अनिल देवतळे (सेलू), अनंत देशमुख (देवळी), भारत चौधरी (हिंगणघाट), बंडू कडू, (आर्वी), प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार, माजी पं.स. सदस्य संतोष सेलुकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.