कर्जमाफीसाठी शिवसेना न्यायालयीन लढाई लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:19 AM2018-07-14T00:19:55+5:302018-07-14T00:21:03+5:30
कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होऊनही अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नावे असतानासुद्धा बँक हेतुपुरस्पर लाभापासून वंचित ठेवतात. बोंडअळी असो की नाफेडच्या तूर खरेदीच्या जमा झालेल्या रकमेची प्रकरणे असो,........
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होऊनही अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नावे असतानासुद्धा बँक हेतुपुरस्पर लाभापासून वंचित ठेवतात. बोंडअळी असो की नाफेडच्या तूर खरेदीच्या जमा झालेल्या रकमेची प्रकरणे असो, यात सदैव शेतकऱ्यांचीच फसवणूक झाली आहे. या निगरगट्ट सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीची प्रकरणे घेऊन थेट न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन वर्धा लोकसभा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांनी केले.
शिवसेनेच्या अल्लीपूर शाखेच्या वतीने गुरुवारी येथे संताजी सभागृहात शेतकरी सन्मान मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी गुढे बोलत होते. कार्यक्रमास शिवसेना उपनेते अशोक शिंदे, शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, युवासेना अचलपूर जिल्हाधिकारी प्रकाश मारोटकर, उपजिल्हाप्रमुख भारत चौधरी, अनंता देशमुख, पंचायत समिती सदस्य अमोल गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटीका पुष्पा काळे यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्याविषयी न्यायीक भूमिका असली पाहिजे व महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा न करण्याच्या अटीवर आजपर्यंत शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. पण सरकारने शेतकऱ्यांनाच रडविण्याचा सपाटा सुरू केला. म्हणून आता शिवसेना रस्त्यांवर उतरून आंदोलनात्मक भूमिका स्वीकारत आहे. या जनआंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपनेते अशोक शिंदे यांनी केले.
शैलेश अग्रवाल यांनी शासनाच्या योजना कशा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आहेत, याबाबत पुराव्यानिधी शेतकऱ्यांपुढे सिद्ध केले. यावेळी जिल्हा प्रमुख राजेश सराफ, बाळा शहार्गडकर यांनीही विचार मांडले. संचालन प्रवीण कात्रे यांनी केले. मेळाव्याच्या आयोजनाकरिता पंकज खोडे, गोपाल मेघरे, मारोतराव भोयर, गजानन चिंचोळकर, शेखर पाटील बिडवाईक, चंदू तडस, दिलीप धुसे, शंकर जोगे, मारोती सुरकार, किसना साखरकर, रामचंद्र बाळबुधे, अशोक सुरकार, राजू वाघमारे, कृष्णा लोणारे, दिलीप भोमले, शंकर भायर, सुधाकर सेलकर, प्रितम वरघणे, किशोर सेलकर, सुधीर चाफले, श्रीधर झाडे यांनी सहकार्य केले.
सेना नेत्यांची शेतकऱ्यांसह बॅकेवर धडक
मेळाव्यात कर्जमाफीच्या प्रकरणांसदर्भात संपूर्ण कागदपत्रे जोडलेले अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात आले. यातील काही प्रकरणांना घेऊन शिवसेना पदाधिकाºयांनी थेट भारतीय स्टेट बँकेची अल्लीपूर शाखाच गाठली. बँक व्यवस्थापक साठवणे यांच्याशी संबंधीत प्रकरणाबाबत चर्चा केली असता बरीच प्रकरणे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतानाही बँकेकडून असहकार्याची मानसिकता दिसून आली. तर सोनेगाव येथील शेतकरी भास्कर खुनकर यांची बँकेने दोन महिन्यांपासून अडवून ठेवलेली नाफेडच्या तूर चुकाऱ्याची ७५ हजारांची रक्कम त्यांना त्वरीत देण्यात आली. बॅकेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.