शिवसेनेचा शिंदे गट ‘तळ्यात’च तर उद्धव ठाकरे गट ‘मळ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 09:53 PM2022-11-04T21:53:09+5:302022-11-04T21:54:15+5:30

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास हिंगणघाट मतदार संघ वगळता इतर मतदार संघात शिवसेनेचे फारसे वलय नाही. आता तर सत्तांतरानंतर शिवसेनाच दुभंगल्याने कोण-कोणत्या गटात सहभागी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील सरकारच अद्यापही अस्थिर असल्याने जिल्ह्यात शिंदे गटाकडून अद्याप तालुक्याच्या नियुक्त्या केलेल्या नाही, त्यामुळे शाखा बांधणीच्या बाबतीत हा गट अजूनही तळ्यातच आहे.

Shiv Sena's Shinde group is in the 'pool' while Uddhav Thackeray's group is in the 'farm'. | शिवसेनेचा शिंदे गट ‘तळ्यात’च तर उद्धव ठाकरे गट ‘मळ्यात’

शिवसेनेचा शिंदे गट ‘तळ्यात’च तर उद्धव ठाकरे गट ‘मळ्यात’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथविण्याकरिता शिवसेनेच्या आमदारांनी बंड करून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. त्यामुळे आता राज्यभरात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये विभागली गेली आहे. वर्ध्यातही हीच परिस्थिती असून, शिंदे गटाकडून अद्यापही शाखा बांधणीला सुरुवात झाली नाही. तर ठाकरे गटाकडून आहे, त्या शाखा कायम ठेवण्यावरच लक्ष्य केंद्रित केल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास हिंगणघाट मतदार संघ वगळता इतर मतदार संघात शिवसेनेचे फारसे वलय नाही. आता तर सत्तांतरानंतर शिवसेनाच दुभंगल्याने कोण-कोणत्या गटात सहभागी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील सरकारच अद्यापही अस्थिर असल्याने जिल्ह्यात शिंदे गटाकडून अद्याप तालुक्याच्या नियुक्त्या केलेल्या नाही, त्यामुळे शाखा बांधणीच्या बाबतीत हा गट अजूनही तळ्यातच आहे. दुसरीकडे पूर्वीपासून असलेल्या शाखा या ठाकरे गटासोबत असून, त्या शाखा आणि त्यामध्ये काम करणारे शिवसैनिक कायम ठेवण्यासाठी पदाधिकारी झटत आहे. असे असले तरीही शिवसेनेचे दोन्ही गट ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याने जिल्ह्यात शिवसेनेची आस्तेकदम वाटचाल सुरू आहे. प्रत्येक पदाधिकारी आपापल्या कामातच व्यस्त आहे.

शिंदे गट शाखा बांधणीपासून लांबच
शिंदे गटाच्या शिवसेनेला आपले अस्तित्व राखण्याकरिता शाखा बांधणी करण्याची गरज आहे; परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये शिंदे गटाकडून केवळ जिल्हा पदाधिकाऱ्यांचीच निवड करण्यात आली आहे. अजून तालुका प्रमुखांच्याही नियुक्त्या बाकी असून, शाखा बांधणीचा अद्याप थांगपत्ताच नाही.

उद्धव ठाकरे गटाच्या बहुतांश गावात शाखा
जिल्ह्यात मूळ शिवसेनेमध्ये असलेले बहुतांश शिवसैनिक अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत कायम आहे. विशेषत: या विभाजनानंतर जुने अनेक शिवसैनिक आता सक्रीय झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्वीपासून असलेल्या शाखा कायम ठेवून त्यामध्ये वाढ करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रयत्नरत आहे.

जिल्हाप्रमुख काय म्हणतात? 

जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून शिवसेनेची पक्ष बांधणी केली आहे. गाव तिथे शाखा या प्रमाणे गावागावात शाखा पोहोचविली. आता सेनेमध्ये फूट पडली असली तरीही आम्ही उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहे.
अनिल देवतारे, जिल्हा प्रमुख, ठाकरे गट 

शिवसेनेमध्ये विभाजन झाल्यानंतर आम्ही शिंदे गटासोबत गेलो. शिंदे गटाकडून नुकताच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आता तालुकास्तरावरील नियुक्त्या होणार असून, त्यानंतर आम्ही नव्या जोमाने आमच्या शाखा बांधणीचे काम हाती घेणार आहोत.
गणेश इखार, जिल्हा प्रमुख, शिंदे गट 

कोणत्या विधानसभा क्षेत्रात काय चित्र? 

वर्धा : या विधानसभा क्षेत्रामध्ये वर्धा आणि सेलू तालुक्याचा समावेश असून, या दोन्ही तालुक्यांत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा प्रभाव जास्त आहे. शिंदे गटाचा नुकताच नवनियुक्त जिल्हा प्रमुख वर्ध्यातील असून, त्यांच्याकडून अद्यापही शाखा बांधणीला सुरुवात झाली नाही. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सेलूतील त्यांनी शाखा कायम ठेवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

देवळी : देवळी आणि पुलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये ठाकरे गटाकडून अद्याप एकाही पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती केलेली नाहीत. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रामध्ये सध्यातरी ठाकरे गटाचीच शिवसेना असल्याचे दिसून येत आहे. येथे बरेच जुने शिवसैनिक आता ठाकरे गटासोबत आले आहेत. या मतदार संघामध्ये शिवसेना तेवढी प्रभावी नाही.

हिंगणघाट : या विधानसभा क्षेत्रात हिंगणघाट आणि समुद्रपूर या तालुक्याचा समावेश असून, या मतदार संघाने शिवसेनेचा राज्यमंत्री दिला आहे. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेची शक्ती मोठी होती; परंतु दरम्यानच्या काळात माजी राज्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आता माजी शहर प्रमुखासह शिवसैनिकांनी भाजपचा हात धरला. 

आर्वी : या मतदार संघामध्ये आर्वी, आष्टी व कारंजा या तीन तालुक्यांचा समावेश असून, या तालुक्यात शिवसेनेचा ठाकरे गटच कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये शिवसेनेचे फारसे वलय नसले तरीही आहे तेही ठाकरे गटाचेच आहे. त्यामुळे याही मतदार संघात शिंदे गटाची अद्यापही एन्ट्री झालेली नाही.
 

 

Web Title: Shiv Sena's Shinde group is in the 'pool' while Uddhav Thackeray's group is in the 'farm'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.