पक्षांंतर्गत वादातून रद्द झाली वर्ध्यातील शिवस्वराज्य यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:47 PM2019-09-10T15:47:53+5:302019-09-10T15:48:51+5:30
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे होणारी शिवस्वराज्य यात्रा पक्षांतर्गत वादामुळे रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य काढण्यात येत आहे. ही यात्रा बुधवारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे येणार होती. यावेळी हिंगणघाट येथे जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र, पक्षांतर्गत वाद उफाळून आला व यात्रेच्या दोन जाहीर सभांचे आयोजन पक्षांतर्गत करण्यात आले. अखेर ही यात्रा रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा प्रारंभ केली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे येथे या यात्रेचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता.११ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ही यात्रा नागपूरवरून येथे येणार होती. माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी या यात्रेची जाहीर सभा आंबेडक र चौकात आयोजित केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. सुधीर कोठारी यांनी शहरात छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथेही एक कार्यक्रम आयोजित केला होता. एकाच गावात दोन ठिकाणी जाहीर सभा होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी मंगळवारी दिवसभर अॅड.कोठारी व माजी आमदार तिमांडे यांच्याशी सल्लामसलत केली; मात्र यावर तोडगा निघू शकला नाही. अखेरीस राऊत यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून हिंगणघाट यात्रेचा कार्यक्रम रद्द करून घेतला. याबाबत जिल्हाध्यक्ष सुनील राऊत लोकमतशी बोलतांना म्हणाले, पक्षपातळीवर कोणतेही मतभेद नाही. दोन्ही नेत्यांशी आपली चर्चा झाली आहे. गणपती विसर्जनानंतर यात्रा हिंगणघाट शहरात येणार आहे. सध्या कार्यक्रम स्थगित केला आहे.
हिंगणघाट शहरात यात्रेचे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माजी आमदार म्हणून पहिले आपल्याला यात्रेची माहिती मिळाली. आपण तयारी सुरू केली. आंबेडकर चौकात जाहीर सभा होणार होती. त्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन झाले. एकाच ठिकाणी कार्यक्रम घेण्यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे यात्रेचा कार्यक्रम रद्द झाला. पक्षातील अंतर्गत बाब याला कारणीभूत आहे.
- प्रा.राजू तिमांडे
माजी आमदार, हिंगणघाट.
शिवस्वराज्य यात्रेचा कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर हा कार्यक्रम घेतला जाईल. नागपूरवरून यात्रा हिंगणघाटला येणार होती. येथून काटोलला जाणार होती. आता हिंगणघाटचा कार्यक्रम होणार नाही.
- अॅड.सुधीर कोठारी
ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.