शिवरायांना मानाचा मुजरा
By admin | Published: March 27, 2016 02:09 AM2016-03-27T02:09:01+5:302016-03-27T02:09:01+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
भव्य शोभायात्रा : रूद्रपूजा, व्याख्यान, रक्तदान शिबिर, बाईक रॅलीतून वंदन
वर्धा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने शहरातून शिवराय संचलन, शोभायात्रा काढण्यात आली. दीपमाळ, अश्वारूढ शिवाजी, रथासह विविध देखावे, ढोल-ताशा पथक व शिवारायांच्या जयघोषात निघालेली शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
वर्धेत शिवाजी चौकातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी वर्धेकरांनी गर्दी केली होती. शिवसोहळ्यासाठी शहरात सर्वत्र भगव्या कमानी उभारण्यात आल्या. भगव्या पताका, झेंड्यांनी शहरातील प्रत्येक चौक सुशोभित करण्यात आला. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी, कृष्णनगर येथील संत गाडगेबाबा मठाजवळील प्रांगणात दुपारी ४ वाजता रूद्रपूजा, शिवचरित्र व्याख्यान पार पडले. यात निशांत अंभोरे यांनी शिवरायांचे विविध प्रसंग शब्दरूपात श्रोत्यांसमोर उभे केले.
शिवसेना प्रांगण बोरगाव (मेघे) येथेही दुपारी ४ वाजता खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर, वक्तृत्व, वेशभूषा, कराटे स्पर्धा पार पडली. शिवाजी ग्रामीण विकास संस्था बोरगाव (मेघे) च्यावतीने शोभायात्राही काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे शिवराय संचनल व मनसेच्या शोभायात्रेत शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अश्वारूढ चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दीपमाळ, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ व अन्य मावळ्यांच्या वेशभूषा लक्षवेधक ठरत होत्या. ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेने वर्धा शहर दुमदुमून गेले होते.
तत्पूर्वी शिवाजी चौकाला भगव्या पतकांनी सजविण्यात आले होते. दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने डोक्याला भगवे फेटे बांधून दुचारीवर रॅली काढण्यात आली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. धुनिवाले मठ परिसरातही शिवसेनेद्वारे शोभायात्रा काढण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रमही धुनिवाले चौकात घेण्यात आले.
ध्वनीक्षेपकावर वाजणारे पोवाडे, स्फूरणगीते वर्धेकरांना शिवशाहीची आठवण करून देत होते. विविध संघटनांच्यावतीने महाराजांना अभिवादन करण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषांनी वातावरणात स्फूरण चढले होते.
सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील चिमुकले सर्वांचे आकर्षण ठरले. शिवरायांची शोभायात्रा डोळ्यांत साठविण्याकरिता रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी झालेली होती.(कार्यालय प्रतिनिधी)