लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महिला जिल्हाधिकाऱ्यांची शिवारफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:00 AM2021-06-10T05:00:00+5:302021-06-10T05:00:06+5:30
देवळी तालुक्यातील भिडी व विजयगोपाल भागात कोविड लसीकरण कमी झाल्याचे लक्षात येताच त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी भिडी गाव गाठून ग्रा.पं. कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. भिडी व नजीकच्या कोलामवस्तीत अतिशय कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. तर विजयगोपाल येथे १ हजार ३०० चे उद्दिष्ट असताना केवळ दोनशेच लाभार्थ्यांनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी/विजयगोपाल : कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या कोविड व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती मिळावी तसेच नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिवारफेरीच सुरू केली आहे. सेलू तालुक्यातील केळझर येथील परिस्थिती जाणून घेतल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट देवळी तालुक्यातील भिडी, विजयगोपाल गाठून लसीकरणाबाबत जनजागृती करीत आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
देवळी तालुक्यातील भिडी व विजयगोपाल भागात कोविड लसीकरण कमी झाल्याचे लक्षात येताच त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी भिडी गाव गाठून ग्रा.पं. कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. भिडी व नजीकच्या कोलामवस्तीत अतिशय कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. तर विजयगोपाल येथे १ हजार ३०० चे उद्दिष्ट असताना केवळ दोनशेच लाभार्थ्यांनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यामुळे संबंधित अधिकारी, ग्रा.पं.सदस्य, आशा व अंगणवाडी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देत नागरिकांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगावे, शिवाय लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचना याप्रसंगी जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिल्या. तसेच कोरोनाची तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी भिडी येथील रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर,ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व बेड किती वाढविता येईल याबाबत चर्चा केली. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंम्बासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार राजेश सरवदे, सरपंच बिरे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. राठोड आदी हजर होते.