शिवशाहीला भारमानाचा ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:33 PM2018-05-09T23:33:03+5:302018-05-09T23:33:03+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत शिवशाही, शिवनेरी या बसेसच्या माध्यमातून खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी राज्यभर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या.

Shivsahila's 'break' | शिवशाहीला भारमानाचा ‘ब्रेक’

शिवशाहीला भारमानाचा ‘ब्रेक’

Next
ठळक मुद्देअल्पावधीतच जिल्ह्यातील बसेस बंद : प्रवाशांची पुन्हा खासगीकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत शिवशाही, शिवनेरी या बसेसच्या माध्यमातून खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी राज्यभर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. वर्धा जिल्ह्यालाही चार शिवशाही बसेस देण्यात आल्या होत्या; पण अल्पावधीतच तोटा होत असल्याचे कारण देत त्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मात्र घोर निराशा झाली आहे.
खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या तुलनेत तत्पर व आरामदायी सेवा देता यावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने नवीन बसेस सुरू केल्यात. पुण्या-मुंबईमध्ये थंडगार एसी बसेस चालविल्या जात आहेत. नागपूर या उपनगरातही महामंडळाने एसी बसेस सुरू केल्या. मोठ्या शहरांमधून या थंडगार बसेसला प्रतिसादही मिळत आहे. यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी लांब पल्ल्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील वर्धा व हिंगणघाट आगारांना प्रत्येक दोन बसेस देण्यात आल्या होत्या. या बसेस शिर्डी आणि औरंगाबाद येथे चालविल्या जात होत्या. प्रारंभी या बसेसला वर्धा जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. अनेक प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सला पाठ दाखवित शिवशाहीकडे वळले होते; पण खासगी वाहतूकदारांपेक्षा अधिक तिकीट दर आकारले जात असल्याने अनेकांनी रापमच्या बसेसला रामराम ठोकला. उणेपूरे तीन ते चार महिन्यांतच वर्धा विभागाला शिवशाहीतून तोटा सहन करावा लागला. वर्धा विभागाला शिवशाहीतून प्रती दिवशी प्रती व्यक्ती ६४.१४ रुपये भारमान अपेक्षित होते; पण तीन-चार महिन्यांत एकही दिवस तेवढे भारमान मिळालेले नाही. भारमानच मिळत नसल्याने शिवशाही जिल्ह्यातून हद्दपारच करण्यात आल्या आहेत. केवळ चारच बसेस दिल्या असताना त्याही बंद केल्याने वर्धा जिल्हा एसी बसेसला मुकला आहे. सध्या या चारही शिवशाही बसेस भंडारा विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.
शिवशाही या एसी बसेस येण्यापूर्वी शिर्डी, शेगाव, औरंगाबाद या शहरांसाठी पारंपरिक लाल बसेस चालविल्या जात होत्या. आता पुन्हा त्याच बसेस लांब पल्ल्यासाठी वापरल्या जात आहे. परिणामी, जिल्ह्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाला मुकावे लागले आहे. शिवाय खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
खासगीपेक्षा अधिक प्रवास भाडे
राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेसचे प्रवास भाडे अधिक आकारले जात होते. खासगी ट्रॅव्हल्सकडून वर्धा ते नागपूरकरिता ८० ते १०० रुपये आकारले जात असताना शिवशाही बसमध्ये १२२ रुपये प्रवास भाडे आकारले जात होते. असाच प्रकार शिर्डी आणि औरंगाबाद येथे जाताना होत होता. खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा अधिक दर असल्याने अनेक प्रवासी ट्रॅव्हल्सला प्रथम प्राधान्य देत होते. यामुळे जिल्ह्यात शिवशाही बसेसला भारमानच मिळाले नाही. वास्तविक, वर्धा येथून पुणे, औरंगाबाद, शिर्डी, जळगाव तथा अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
केवळ सिटींग अरेंजमेंटमुळे त्रास
रापमच्या शिवशाही बसेस एअर कंडीशनर असल्या तरी त्यामध्ये प्रवाशांची केवळ सिटींग अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. प्रवासात झोप घेण्याची सोय नाही. या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्समध्ये स्लीपिंग अरेंजमेंट केलेली आहे. यामुळे अनेक प्रवासी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देताना दिसतात.
आर्वी-शेगावला आदेशाची वाट
वर्धा जिल्ह्यात चार शिवशाही बसेस दिल्यानंतर आर्वी आगारातही शिवशाही बस देण्याची मागणी वाढली होती. ही बस आर्वी ते शेगाव सुरू करण्याची मागणी होती. तत्सम प्रस्तावही वर्धा विभागाकडून पाठविण्यात आला. याबाबत वर्धा विभागाकडून पाठपुरावाही करण्यात आला. तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्वच शिवशाही बसेस बंद झाल्या. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयातून ही बस सुरू करण्याबाबत कुठलाही आदेश आला नाही. यामुळे आता आर्वी ते शेगाव शिवशाही बस सुरू करण्याचा प्रस्ताव बारगळलाच म्हणावा लागेल. या ऐवजी साधी बस सुरू करण्यास मात्र वाव आहे.
निराशेने माघारी परतले प्रवासी
नाचणगाव - नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायक व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केली. लांबपल्ला गाठणाऱ्या प्रवाशांनीही याला प्रतिसाद दिला. पुलगाव बसस्थानकावर येणाऱ्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बस वर्धा, हिंगणघाट आगारातून होत्या; पण काही दिवसांपासून सदर बस येथे येणे बंद झाले आहे. प्रवासी सकाळी बसच्या वेळेत बसस्थानकावर हजर राहतात; पण कित्येक तास वाट पाहिल्यानंतर उन्हात त्यांना घरी परतावे लागते. पुलगाव बसस्थानकावर शिवशाहीचे आकर्षक बेंच, फलक लागले आहे; पण बस का येऊ शकत नाही, याबाबत ते समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. शिवशाही बसेस बंद झाल्याने तत्सम फलक लावणे गरजेचे आहे. यामुळे किमान प्रवाशांची ताटकळ होणार नाही.

Web Title: Shivsahila's 'break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.