कर्जमाफीवरून भाजपला अडचणीत आणण्यासाठी सेना विदर्भात आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:05 PM2017-10-28T16:05:20+5:302017-10-28T16:14:29+5:30
राज्यात भाजप सोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा भंडाफोड करून भाजपच्या अडचणी वाढविण्याचा विडा विदर्भात उचलला आहे.
अभिनय खोपडे ।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : राज्यात भाजप सोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा भंडाफोड करून भाजपच्या अडचणी वाढविण्याचा विडा विदर्भात उचलला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्याबाबत आदेश देताच विदर्भात सेना नेते आक्रमक झाले आहेत. विदर्भाच्या विविध तालुका मुख्यालयात २७ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत सेनेने बँकांसमोर मंडप टाकून शेतकऱ्याकडून अडचणी लिहून घेण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे ही कर्जमाफी योजना किती खरी याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेने आग्रहीपणे लावून धरली होती. काँग्रेसने या संदर्भात राज्याच्या विविध भागात संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर शिवसेनेने अनेक बँकांसमोर ढोलताशे वाजवून भाजपला अडचणीत आणण्याचे काम केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. यात दीड लाखांपर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. व नियमित कर्ज भरणाऱ्याना अनुदान दिले जाणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या मंत्र्यांनी धनादेश वितरित करण्याचे काम दिवाळीपूर्वीच केले. व २७ आॅक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची व्यवस्था केली. मात्र बँकेत शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. ही बाब लक्षात घेवून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करण्याच्या दृष्टीकोणातून विविध तालुक्यात शेतकरी मार्गदर्शन व मदत केंद्र सुरू करून थेट भाजपवरच हल्लाबोल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कर्जमाफी योजनेचे श्रेय भाजपच्या पदरात पडू नये यासाठी शिवसेनेचे नेते आक्रमक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अत्यल्पच मिळणार अनेकांना रकमा मिळाल्या नाही.या बाबीवर फोकस करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वत: संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे.
अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यासंदर्भातील माहिती नाही. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने बँकेत उत्तर दिल्या जात नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, संपर्क नंबर आदी माहिती आम्ही जमा करून घेत आहोत. शिवसेनेचे कार्यकर्ते अशा शेतकऱ्यांसोबत बँकेतील व त्याच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास येणाºया अडचणी दूर करण्यास मदत करेल. शेतीचे काम सोडून शेतकऱ्यांला बँकेकडे पुन्हा पुन्हा यावे लागणार नाही. सर्व काम शिवसैनिक करून देतील. यासाठीच मदत व मार्गदर्शन केंद्र आहे. शिवाय अनेकांनी या कर्जमाफीचे श्रेय घेणारे फलक गावागावात लावले आहे. ते फलकावर तर आम्ही शेतकऱ्यांसोबत मदतीसाठी आहो हा ही संदेश या अभियानातून शिवसेनेला जनतेला द्यायचा आहे.
- अशोक शिंदे
संपर्क प्रमुख, शिवसेना व माजी आमदार,हिंगणघाट विधानसभा क्षेत्र