शिवसेनेकडून ग्रामपंचायतच्या खुर्च्यांची होळी
By admin | Published: April 6, 2016 02:11 AM2016-04-06T02:11:21+5:302016-04-06T02:11:21+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता जुनघरे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतमधील खुर्च्या बाहेर आणून जाळल्या.
नाचणगाव येथील घटना : सरपंचावर कारवाई होत नसल्याने जाळपोळ
नाचणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता जुनघरे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतमधील खुर्च्या बाहेर आणून जाळल्या. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेवून जूनघरे या सरपंच झाल्याचा आरोपही शिवसेनेद्वारे यावेळी करण्यात आला होता.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांआधी येथील उपसरपंच तुषार पेंढारकर यांना निवेदन देवून सरपंच सुनिता जुनघरे यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. खोटे जात प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला बनविल्याचा आरोप त्यांच्यावर शिवेसेनेद्वार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. या निवेदनाची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्याने मंगळवारी शिवसैनिकांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यानंतर सरपंचाच्या कक्षात ठेवलेल्या खुर्च्या टेबल आदी साहित्य बाहेर काढून त्यांची होळी केली. सोबतच ग्रामपंचायतला कुलूपही ठोकले. यावेळी सरपंच आणि तिच्या पती विरोधात घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष पांडे, सतीश पेठे, सतीश पाटील यांच्यासह इतरही शिवसैनिक सहभागी होते.
या संदर्भात पुलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांना विचारणा केली असता, प्रशासनाद्वारे अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार येताच पोलिसांद्वारे कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.(वार्ताहर)