शिवसेनेने ताणली ‘प्रत्यंचा’
By Admin | Published: January 22, 2017 12:26 AM2017-01-22T00:26:00+5:302017-01-22T00:26:00+5:30
शिवसेना-भाजप युतीचा चेंडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे.
दीपक सावंत : सर्व ५२ जागांसाठी ९७ इच्छुकांच्या मुलाखती
वर्धा : शिवसेना-भाजप युतीचा चेंडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे. युती होईल तेव्हा होईल; पण वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने सर्व ५२ जागाही लढण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग देत धनुष्याची प्रत्यंचा ताणली आहे.
शिवसेनेचे नेते आरोग्य राज्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी वर्धेत जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ आणि पंचायत समितीच्या सर्व १०४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जिल्हा परिषदेसाठी ९७ जण या मुलाखतींना सामोरे गेले तर पंचायत समितीसाठी तब्बल ३०० जणांनी मुलाखती दिल्याची माहिती ना. सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
इच्छुकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा चांगला असल्यामुळे पक्षाला जिल्ह्यात चांगलेच यश येईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेना उमेदवारांची घोषणा २५ जानेवारीला करण्यात येणार असल्याची माहितीही ना. सावंत यांनी याप्रसंगी दिली. शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना ना. सावंत म्हणाले, युती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युती झाल्यास पक्षादेश पाळला जाईल.
शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. वर्धा जिल्ह्यात ९० टक्केपेक्षा अधिक जागा शिवसेना लढणार, हे आधीच ठरले होते. पूर्ण जागा लढण्याच्या दिशेनेही तयारी सुरू आहे; पण ९० टक्केपेक्षा अधिक जागा हमखास लढणार असल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे वर्धा जिल्ह्याचे नेते माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख निलेश देशमुख व वर्धा तालुकाप्रमुख राजेश सराफ उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
निवडणूक हे राजकीय युद्ध
शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी सरकारमध्ये झालेल्या चांगल्या निर्णयाबाबत शिवसेना सोबत राहिली आहे; पण जे निर्णय जनतेच्या दृष्टीने बरोबर नाहीत, अशा मुद्यांवर शिवसेना विरोधाची भूमिका घेत आली आहे. निवडणुकीत युती न झाल्यास निवडणूक राजकीय युद्धाप्रमाणे लढली जाईल, असेही ना. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले.
२५ जानेवारीला होणार उमेदवारांची घोषणा
शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा येत्या २५ जानेवारीला करणार आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच जागांवर सेना आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. ९० टक्केपेक्षा अधिक जागा लढण्याची तयारी पूर्णत्वास गेल्याचे यावेळी सांगण्यात आले.