ट्रॅव्हल्सच्या धडकेत मुलगी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:53 PM2017-10-14T23:53:07+5:302017-10-14T23:53:21+5:30

मंदिरातून येत असलेल्या मुलीला भरधाव ट्रॅव्हल्सने तिच्या घरासमोरच चिरडल्याने मुलगी जागीच ठार झाली. हा अपघात नागपूर-यवतमाळ मार्गावरील शिरपूर (होरे) येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडला.

In the shocks of travels, the girl died | ट्रॅव्हल्सच्या धडकेत मुलगी ठार

ट्रॅव्हल्सच्या धडकेत मुलगी ठार

Next
ठळक मुद्देगावकरी संतप्त : वाहनांची तोडफोड; वाहतुकीचा खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी/विजयगोपाल : मंदिरातून येत असलेल्या मुलीला भरधाव ट्रॅव्हल्सने तिच्या घरासमोरच चिरडल्याने मुलगी जागीच ठार झाली. हा अपघात नागपूर-यवतमाळ मार्गावरील शिरपूर (होरे) येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडला. या अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. बिट्टु गजानन राजुरकर (११) रा. शिरपूर (होरे), असे मृतक मुलीचे नाव आहे.
या घटनेने संतप्त झालेल्या येथील नागरिकांनी अपघातास कारण ठरलेल्या ट्रॅव्हल्सची तोडफोड केली. मृतदेह रस्त्यावर ठेवत वाहतूक रोखून धरली. यामुळे सुमारे तीन ते चार तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या परिसरात यापूर्वीही अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे येथे गतिरोधक लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. शिवाय जोपर्यंत गतिरोधक लागणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांचा रोष पाहून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
पोलीस सुत्रानुसार, बिट्टू राजुरकर ही सकाळी घरासमोरच असलेल्या मंदिरात काकडा आरतीसाठी गेली होती. काकडा आरतीचा कार्यक्रम आटोपून ती घरी पेन आणण्याकरिता जात असताना रस्ता ओलांडताना यवतमाळकडून भरधाव येणाºया एमएच ४० एटी ७०७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने तिला जबर धडक दिली. यात ती ट्रॅव्हल्सखाली चिरडल्या जावून जागीच ठार झाली. दरम्यान, ट्रॅव्हल्स चालकाने पळ काढला. सदर ट्रॅॅव्हल्सला भिडी येथे लोकांनी अडवून चालकाला चांगलाच चोप देत देवळी पोलिसांच्या स्वाधीन केले.
या मार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आज झालेल्या भिषण अपघातामुळे शिरपूर येथील गावकºयांनी रस्त्यावर बसून महामार्ग चार तास रोखून धरत संतप्त भावना व्यक्त केल्या.
वाहनाच्या धडकेत युवक ठार
सिंदी (रेल्वे) - रस्ता ओलांडण्याकरिता उभ्या असलेल्या युवकाला भरधाव वाहनाने धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कांढळी येथे शनिवारी सकाळी घडली. प्रवीण जुमडे, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस सुत्रानुसार, सिंदी (रेल्वे) येथील प्रवीण जुमडे हा जाम येथील पी.व्ही. टेक्सटाईल्समध्ये कामाकरिता जात होता. दरम्यान कांढळी येथे रस्ता ओलांडताना त्याला एमएच ३३ - ०५६० क्रमांकाच्या वाहनाने धडक दिली. यात प्रवीण याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती प्रवीणचे वडील जनार्धन यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सदर वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
घटेची माहिती मिळताच खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठत नागरिकांशी चर्चा केली. गतिरोधकाची मागणी पूर्ण करण्याकरिता स्वत: शिरपूर मार्गावर बसून जोपर्यंत गतिरोधक लावत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. याची दखल घेत महामार्गावर शिरपूर बसस्थानकानजीक चार गतिरोधक लावण्यात आलेत. त्यानंतरच महामार्गावरची वाहतूक सुरू झाली.
यापूर्वी गेले तीन जीव
राजूरकर यांच्याच बाजूला असलेले राधाबाई दत्तुजी भोयर यांचाही येथेच झालेल्या अपघातात मृत्यू झाला. शालीक वाटकर यांचा मुलगाही त्याच ठिकाणी अपघातात ठार झाला. आज बिट्टू राजूरकर हिचा बळी गेला. या तीनही जणांची घरे एकमेकाला लागून आहेत. यामुळे आज शिरपूरची जनता रस्त्यावर उतरली. येथे आधीच स्पीड ब्रेकर लावले असते तर त्या मुलीचा जीव वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Web Title: In the shocks of travels, the girl died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.