दुकानदारांनी स्वत:च काढले अतिक्रमण
By Admin | Published: January 13, 2017 01:19 AM2017-01-13T01:19:14+5:302017-01-13T01:19:14+5:30
शहरातून जाणाऱ्या अमरावती हिंगणघाट आर्वी-शिरपूर या राज्य मार्गासह हैदराबाद-भोपाळ व नागपूर-मुंबई या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे.
महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी राबविण्यात आली मोहीम
पुलगाव : शहरातून जाणाऱ्या अमरावती हिंगणघाट आर्वी-शिरपूर या राज्य मार्गासह हैदराबाद-भोपाळ व नागपूर-मुंबई या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या मार्गाच्या विस्तारीकरण करण्यात येत आहे. या कामाला प्रारंभ होणार असून या महामार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ झाला आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याकरिता तीन दिवसांपूर्वीच प्रशासनाद्वारे सूचना देण्यात आली होती. आदेशाप्रमाणे १२ जानेवारीपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जेसीबी गजराज ट्रॅक्स, पोलीस व कर्मचारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परंतु प्रशासनाच्या कार्यवाहीपूर्वी पुलगाव, देवळी व पुलगाव, नाचणगाव मार्गावरील लहान दुकानदारांनी आपले पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या हटविल्या तर काही दुकानदारांनी दुकानासमोर लावलेले टिनाचे शेडही काढले. प्रशासनाद्वारे कुठेही बळजबरीने अतिक्रमण हटविल्याचे वृत्त नाही.
अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले
पुलगाव : शहरातील एकमात्र मोठा उद्योग पुलगाव कॉटन मील बंद झाल्याने बेरोजगार झालेल्या अनेकांनी मिळालेल्या पैशात रस्त्याच्या बाजूला लहान मोठी दुकाने थाटून उदरनिर्वाहाचा मार्ग निवडला होता. परंतु गत दहा वर्षांत दोनदा अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र या मार्गाचे विस्तारीकरण झाले नाही. मिळालेला पैसा अशा रोजगारात लावला आता अतिक्रमण हटविल्यामुळे रोजगार बंद होऊन अनेक कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे.(तालुका प्रतिनिधी)