लघु सिंचन प्रकल्प वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:17 AM2017-08-28T00:17:44+5:302017-08-28T00:18:24+5:30
पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाणी हेच जीवन आहे, असे म्हणत अनेक योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; पण राबविलेल्या योजनांची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारली जात नाही. असाच प्रकार सिंचन विभागातील योजनांबाबत घडत असल्याने लघु प्रकल्पांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या वर्धा शहरालगतच्या तथा आर्वी लघु पाटबंधारे उपविभागांतर्गत येणाºया रोठा तलावाकडे कानाडोळा केला जात असल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, तेथील गोदामांवर अतिक्रमण झाले असून विटभट्ट्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात १९ लघु प्रकल्प आहेत. सिंचन क्षमता वाढावी, शेतकºयांना पाणी म्ळिावे, भूगर्भातील जलपातळी वाढावी म्हणून या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली; पण या तलावांकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचेच दिसते. केवळ नोंदी घेण्यापूरतेच हे तलाव राहिले आहेत. पावसाळ्यात तलावाने जलपातळी न गाठल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण कारणांचा शोध घेण्याचे सौजन्य लघु पाटबंधारे विभाग दाखवित नाही. वर्धा लगत रोठा वन आणि रोठा टू हे दोन तलाव आहेत. या तलावांची निर्मिती २५ ते ३० वर्षांपूर्वी करण्यात आली. यातील रोठा वनची माहिती देणारे फलकही त्या भागात अस्तित्वात नाहीत. रोठा टू या तलावासाठी १८९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे फलकावर नमूद आहे. १६२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करता येईल, एवढी क्षमता या तलावाची असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील खरीप हंगामात ७७ हेक्टर तर रबी हंगामात ८५ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे सिंचन होत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या तलावाच्या बुडित क्षेत्रातील सर्व अतिक्रमण हटविण्यात आल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते; पण प्रत्यक्षात या परिसरात मोठे अतिक्रमण असल्याचे पाहावयास मिळते. रोठा वन व टु च्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. या परिसरात सुमारे दोन हजार चौरस फुटामध्ये तीन गोदामांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्वी या गोदामांमध्ये सिमेंट ठेवले जात होते. या गोदामावर सध्या परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. गोदामांमध्ये जनावरे बांधली जात असून खत, शेतीपयोगी साहित्य ठेवले जात असल्याचे दिसून आले. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता गोदामांचे दोन हजार रुपये मासिक भाडे दिले जात असल्याचे सांगण्यात आले. भाडे वसुलीकरिता संबंधित विभागाचा एक व्यक्ती येत असल्याचेही परिसरातील नागरिक सांगतात. शिवाय तलाव परिसरातच विटभट्ट्या आहेत. काही भट्टीधारक तलाव परिसरातील माती चोरत असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
घटनांकडे लघु पाटबंधारे तथा पोलिसांचे दुर्लक्ष
रोठा वन व टू या दोन तलावांच्या परिसरात आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. हत्यांपासून तर आत्महत्यांसारख्या घटना घडत असताना तेथील व्यवस्थेकडे लक्ष दिले जात नाही. प्रेमी युगूल या भागात सर्रास हुंदडताना दिसत असून त्यांना हटकण्याकरिता कुणी राहत नाही. शिवाय ओल्या पार्ट्यांसाठीही या भागाचा गैरवापर केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे तलावांची तथा पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.