पूर्वी लसकोंडी; आता सिरिंजकोंडी! लसीकरण मोहिमेला लागतोय ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 10:05 PM2021-09-13T22:05:50+5:302021-09-13T22:06:17+5:30

Wardha News लसकोंडीतून सुटका होत नाहीच तो आता कोविड लसीकरण मोहिमेला युद्धपातळीवर गती देण्यासाठी उपयुक्त ठरणारी एडी सिरिंज अल्प प्रमाणात पाठवून वर्धा जिल्ह्याची सिरिंजकोंडीच केली जात आहे.

Shortage of syringe! Vaccination campaign slow down in Wardha district | पूर्वी लसकोंडी; आता सिरिंजकोंडी! लसीकरण मोहिमेला लागतोय ब्रेक

पूर्वी लसकोंडी; आता सिरिंजकोंडी! लसीकरण मोहिमेला लागतोय ब्रेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : शून्य वेस्टेजसह कोविड लसीकरण मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या वर्धा जिल्ह्याची शासनाकडून पूर्वी अल्प लससाठा देऊन लसकोंडी करण्यात आली. या लसकोंडीतून सुटका होत नाहीच तो आता कोविड लसीकरण मोहिमेला युद्धपातळीवर गती देण्यासाठी उपयुक्त ठरणारी एडी सिरिंज अल्प प्रमाणात पाठवून वर्धा जिल्ह्याची सिरिंजकोंडीच केली जात आहे. या लसकोंडीमुळे युद्धपातळीवर सुरू असलेल्या काेविड लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम होत आहेत. (Shortage of syringe! Vaccination campaign slow down in Wardha district)

 

कोविडची प्रतिबंधात्मक लस लाभार्थ्यांना देण्यासाठी एडी सिरिंजचा वापर केला जातो. परंतु, मागील काही दिवसांपासून राज्यालाच मिळणाऱ्या सिरिंज साठ्यात घट झाली आहे. वर्धा जिल्ह्यात सद्य:स्थितीत १६ हजार एडी सिरिंज असून, याच सिरिंजचा वापर लहान मुलांना लस देण्यासह कोविड प्रतिबंधात्मक लस घेऊ इच्छिणाऱ्याला कोविड व्हॅक्सिन देण्यासाठी केला जात आहे. कोविड लसीकरण मोहीम राबविताना प्रत्येक दिवशी वर्धा जिल्ह्याला किमान दहा हजार एडी सिरिंजची आवश्यकता असते. त्यामुळे हा सिरिंजसाठा नाममात्रच असल्याचे सांगण्यात येते. वर्धा जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला मिळत असलेल्या प्रतिसादाला लक्षात घेऊन शासनाने वर्धा जिल्ह्याला कोविड प्रतिबंधात्मक लस तसेच एडी सिरिंजचा मुबलक पुरवठा करण्याची गरज आहे.

काय आहे एडी सिरिंज

कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी एडी सिरिंजचा वापर केला जात असून, कुपीतून ५ मिली द्रावण ओढल्यानंतर ही सिरिंज ऑटो लॉक होते. त्यामुळे एका कुपीतून ११ ते १२ डोस दिले जातात. लसीचा एक डोस देण्यासाठीच या सिरिंजचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले.

 

२ सीसी सिरिंज कशी असते

एडी सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने वर्धा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यासाठी २ सीसी सिरिंजचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. छोट्या मुलांना लस देण्यासाठी या सिरिंजचा वापर होतो. काहीशी जाडी असलेल्या या सिरिंजमध्ये एक ते दीड मिली द्रावण वेस्ट जाते.

 

दहा हजार सिरिंज लागतात रोज जिल्ह्याला

कोविड लसीकरण मोहिमेला वर्धा जिल्ह्यातील नागरिक स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आहेत. प्रत्येक दिवशी वर्धा जिल्ह्याला किमान १० हजार सिरिंज लागतात. परंतु, मागील काही दिवसांपासून सिरिंज तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम राबविणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

 

अन् वेस्टेज वाढणार

एडी सिरिंजचा प्रभावीपणे वापर होत असल्यामुळे वर्धा जिल्ह्यात कोविड लसीचे सध्या शून्य वेस्टेज आहे; पण सध्या सिरिंजच्या तुटवड्याला वर्धा जिल्ह्याला तोंड द्यावे लागत असून, जिल्ह्यात २ सीसी सिरिंजचा वापर झाल्यास लस वेस्टेज जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात सध्या १६ हजार एडी सिरिंजचा साठा आहे. असे असले तरी कोविड लसीकरण मोहीम राबविताना प्रत्येक दिवशी किमान १० हजार एडी सिरिंज वर्धा जिल्ह्याला लागतात. शासनाकडून वेळीच एडी सिरिंजचा मुबलक साठा मिळेल अशी अपेक्षा आहे.

- डॉ. प्रवीण वेदपाठक, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: Shortage of syringe! Vaccination campaign slow down in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.