तूर उत्पादकांना फटका
By admin | Published: August 22, 2016 12:39 AM2016-08-22T00:39:58+5:302016-08-22T00:39:58+5:30
जिल्ह्यात नऊ हजारापेक्षा जास्त भाव असलेल्या तुरीचे दर शनिवारी पाच ते सहा हजाराने पडले.
शेतकरी चिंतातूर : एका महिन्यात चार हजारांची घसरण
वर्धा : जिल्ह्यात नऊ हजारापेक्षा जास्त भाव असलेल्या तुरीचे दर शनिवारी पाच ते सहा हजाराने पडले. यामुळे दरवाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना या एका महिन्यात सरासरी चार हजार रुपयांची फटका बसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील बाजार समितीत देत असलेले दर पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. यामुळे दरवाढीच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.
तुरीचे भाव गत वर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्यात वाढतील या अपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या तुरी न विकता घरी साठवून ठेवल्या होत्या. अशा शेतकऱ्यांना यामुळे चांगलाच फटका बसला आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी तुरीचे भाव प्रति क्विंटल नऊ हजारावर होते. तुरीचे भाव दहा हजार होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तुरी घरी साठवून ठेवल्या. जुलैच्या १५ तारखेपासून तुरीचे भाव पडणे सुरू झाले. एक महिन्याच्या कालावधीत तुरीचे भाव चार हजाराने कमी होवून आता ते सहा हजाराने खाली आले आहे. एका महिन्यात भावात झालेल्या या घसरणीमुळे तूर उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. तुरीचे बाजारभाव दररोज खाली येत आहे. ते येत्या दिवसात कधीतरी वाढतील या आशेने ज्या शेतकऱ्यांनी तुरी घरी ठेवल्या त्यांची चिंता वाढली आहे. बाजारात कोणत्याच वस्तूचे भाव अस्थिर राहत नाही. याला अपवाद फक्त शेतकऱ्यांचा माल ठरतो. ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.
तूर डाळीचे भाव वधारताच समाजातील सर्व घटक ओरड करतात. आता शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान होत असताना कोणीच आवाज काढत नाही. वास्तविकता बाजारात आजही उत्तम तूर डाळ १२० ते १३० रुपये किलो आहे.
शासनाने स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करून दिलेली डाळ ९५ रुपये किलो असली तरी तिचा दर्जा निकृष्ठ असल्याची ओरड आहे. विदर्भातील स्वस्त धान्य दुकानातून १०३ रुपये किलोप्रमाणे वितरीत होणारी तूर डाळ अत्यंत निकृष्ठ प्रतीची असल्याने स्वस्त धान्य दुकानदार तिची उचल करण्यास उत्सूक नसल्याची चर्चा बाजारात आहे.(प्रतिनिधी)