शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा संचालक असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:16 AM2018-02-24T00:16:43+5:302018-02-24T00:16:43+5:30
हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा.....
ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा या दृष्टीने बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे, असे पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ४ कोटींच्या नवीन लिलाव शेडच्या लोकार्पण प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री तथा आ. रणजित कांबळे, किशोर दिघे, बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थूटे, आर्वी बाजार समितीचे दिलीप काळे, समुद्रपूर बाजार समितीचे हिम्मत चतुर, मधुसूदन हरणे, उपसभापती हरीष वडतकर आदींची उपस्थिती होती.
ना. देशमुख पुढे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी बाजार समित्या खुल्या बाजारात येत असताना या बाजार समित्या आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाल्या पाहिजे. राज्यातील शेतकरी सन्मानाने जगावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आॅनलाईन कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले आहे. पहिल्या पात्र यादीत ४७.३१ लाख खातेदाराचा समावेश आहे. त्यांचे २३ हजार कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत. त्यापैकी १२ हजार ३८१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. ३१ मार्चपर्यंत या सर्वांचा सातबारा कोरा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जुलैनंतर कुणाकडूनही व्याजाची वसुली केली जाणार नाही. जे शेतकरी निकषात बसतात; पण अन्य कारणाने ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी ३१ मार्चनंतर अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पहिली यादी क्लिअर झाली की अन्य पात्र शेतकरी यांनाही न्याय देण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मार्गदर्शन करताना आ. रणजित कांबळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारने पुढाकार द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा घोडे व इब्राहिम बक्स यांनी केले. कार्यक्रमादरम्यान शेतकरी पाल्याना लॅपटॉप वितरण, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटप, विविध योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. आभार सचिव टी. सी. चांभारे यांनी मानले.