जीवनोपयोगी शिक्षण मिळाले पाहिजे -गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:30 PM2019-07-06T22:30:24+5:302019-07-06T22:31:02+5:30
शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातून मिळणारी मदत ही चांगली बाब आहे. यामुळे शाळेशी समाजाचा असणारा संबंध अधिक घट्ट होतो. बालवयात शाळेतील संस्कार मोठ्यापणी पण कायम असल्याने जीवनात उपयोगी पडतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातून मिळणारी मदत ही चांगली बाब आहे. यामुळे शाळेशी समाजाचा असणारा संबंध अधिक घट्ट होतो. बालवयात शाळेतील संस्कार मोठ्यापणी पण कायम असल्याने जीवनात उपयोगी पडतात. विविध विषय आपण शिकत असलो तरी पण जीवन उपयोगी शिक्षणाची गरज यशस्वीतेसाठी उपयोगी ठरते, असे मत गांधी सेवा संघाचे अध्यक्ष व समाज संवर्धन समितीचे सचिव कनकमल गांधी यांनी व्यक्त केले.
हमदापूर येथील यशवंत विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश भोयर तर अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट सेवाग्रामचे सचिव डॉ. शिवकुमार, संचालिका गीता गुप्ता व राम गोडसे यांची उपस्थिती होती.
डॉ. शिवकुमार यांनी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट हा गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत असतात असे सांगितले तर रमेश भोयर यांनी सामाजिक दायित्वातून विद्यार्थ्यांना ही मदत आहे. शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये हा प्रयत्न स्तुत्य आहे. याची जाणीव ठेवावी, असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान सहावी ते दहावीच्या ५६ विद्यार्थिनी व ३४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संचालन संजय भगत यांनी केले तर आभार गणेश कोचे यांनी मानले.