रूंदीकरणात आर्वी नाका चौकात वळण देऊ नये!
By admin | Published: January 23, 2017 12:50 AM2017-01-23T00:50:54+5:302017-01-23T00:50:54+5:30
धुनिवाले चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत रस्ता रूंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे.
‘युवा परिवर्तन की आवाज’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
वर्धा : धुनिवाले चौक ते आर्वी नाका चौकापर्यंत रस्ता रूंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. या रस्त्याला आर्वी नाका चौकात वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे रस्त्याला वळण दिल्यास अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यात वळण न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बॅचलर रोडवरील अतिक्रमण काढण्यासोबतच या मार्गाला आर्वी नाका चौक येथे वळण न देता थेट बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. रस्ता रूंदीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात अनेक पक्क्या बांधकामाचे अडथळे आहेत. आर्वी नाका चौक परिसरात वसंत प्राथमिक शाळेशेजारी अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. काही मंडळी राजकीय वलयात वावरणारी असून त्यांनी केलेले अतिक्रमण वाचविण्याच्या प्रयत्न होत आहेत. हे अतिक्रमण पाठीशी घालण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गाला वळण देण्याचा बेत आखत आहे. असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
आर्वी नाका परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, यात कोणताही मतभेद करण्यात येऊ नये. याशिवाय रस्ता रूंदीकरणाकरिता मार्गालगतच्या दीडशेवर वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. रस्ता बांधकाम करताना वृक्षांची कत्तल टाळावी. रस्त्याचे बांधकाम झाल्यावर सौंदर्यीकरणात भर घालण्याकरिता अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यात यावी, आदी मागण्या संघटनेने निवेदनातून केल्या आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. शिष्टमंडळात निहाल पांडे, गौरव वानखेडे, पलाश उमाटे, सौरभ माकोडे, ऋषिकेश सरोदे, हेमंत भोसले, समीर गिरी, ऋषिकेश बुटले, राहुल मिश्रा, आशुतोष परटक्के, कुणाल ताल्हण तसेच संघटनेच्या सदस्यांचा समावेश होता.(स्थानिक प्रतिनिधी)