एसडीओ आणि तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांचे कारणे दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:35 AM2017-07-23T00:35:25+5:302017-07-23T00:35:25+5:30
आर्वी तालुक्यातील वडगाव -१ या रेतीघाटावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी व त्यांच्या चमूने कारवाई केली.
वडगाव रेती घाटाचे प्रकरण : वर्धेच्या चमूकडून कारवाई; स्थानिकांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील वडगाव -१ या रेतीघाटावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी व त्यांच्या चमूने कारवाई केली. या कारवाईत चार ट्रक आणि चार बोटी जप्त करण्यात आल्या. घाटावर वर्धेतील चमू जावून कारवाई करते आणि स्थानिक कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीचे उत्तर दोन्ही अधिकाऱ्यांना सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सादर करावयाचे आहे.
आर्वी तालुक्यातील वडगाव -१ या रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सूचनेवरून खनिकर्म अधिकारी इम्रान खान यांनी त्यांच्या चमूसह या घाटाची पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यानुसार सदर चमू कारवाई करण्याकरिता गेली असता येथे मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याचे दिसून आले. शिवाय मार्गावरच रेतीची अवैध वाहतूक करताना चार ट्रक मिळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे रेती वाहतुकीची कागदपत्रे नसल्याचे दिसून आले. यामुळे सदर ट्रक जप्त करण्याची करवाई करण्यात आली. यानंतर चमुने त्यांचा मोर्चा वडगाव -१ रेती घाटावर वळविला. येथे कोणी नसले तरी रेती उपस्याकरिता चार बोटी असल्याचे दिसून आले. त्याचा पंचनामा करून त्या बोटी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य आर्वी तहसीलदारांच्या हवाली करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आला. एवढी मोठी गडबड असताना स्थानिक अधिकारी काय करतात, असे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट एसडीओ आणि तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दंड करूनही वाहने सोडल्याची माहिती
जिल्ह्याच्या चमूने केलेल्या कारवाईत जप्त केलेले साहित्य या चमूने दंड आकारून सोडल्याची माहिती आहे. त्यांना काय दंड आकारला याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागविल्याची माहिती आहे.
रेतीघाट बंद करणार ?
गत अनेक दिवसांपासून येत असलेल्या तक्रारींवरून वडगाव घाट बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यवाही सुरू झाल्याची माहिती आहे. आलेल्या तक्रारी आणि केलेल्या कारवाईवरून हा घाट का बंद करू नये, याचे उत्तर घाट मालकाला मागितल्याची माहिती आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आर्वी तालुक्यातील वडगाव -१ या रेती घाटाची तपासणी करण्यात आली. यात अनेक प्रकारचा घोळ असल्याचे समोर आले. यावरून कारवाई करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आर्वी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. यावर नोटीनुसार लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.
- इम्रान खान, जिल्हा खनिकर्म अधिकारी.वर्धा