जादूटोण्याच्या संशयावरून ‘श्रावण’ची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:14 AM2019-02-07T00:14:58+5:302019-02-07T00:15:47+5:30
देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान श्रावणचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुलगाव पोलिसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध सुरु होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान श्रावणचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुलगाव पोलिसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध सुरु होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जादूटोण्याच्या संशयावरुन केवळ पाच हजारांची सुपारी घेवून श्रावणची हत्या केल्याचे आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आले आहे.
इंझाळा येथील शेतकरी मंगेश भानखेडे यांच्या शेतातील गोटफॉर्मवर बुधवारी रात्रीला काही जण आले. त्यांनी पळ काढण्यापूर्वी रखवालदार श्रावण पंधराम याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. शेतातून पळ काढताना आरोपींपैकी एक जण शेतातील विहिरीत पडला. त्याला शेतमालक मंगेश भानखेडे यांनी रखवालदार समजून विहिरीबाहेर काढले होते. परंतु, मोठ्या शिताफिने त्यानेही घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पुलगाव पोलिसात भादंविच्या कलम ३०२ अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पुलगाव पोलीस आरोपींचा शोध घेत होते. परंतु, त्यांना यश आले नसल्याने हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले. दरम्यान माहितीच्या आधारे पोलिसांनी रमेश शंकर पाखरे (४०) रा. इंझाळा, ईश्वर अशोक पिंजरकर (३६), अंकुश उर्फ मोन्या विलास शेंडे (२४) दोन्ही रा. नाचणगाव आणि नाचणगाव येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवा-उडवीचे उत्तर देणारे हे संशयीत पोलिसी हिसका दाखविताच बोलके झाले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पंकज पवार, आशीष मोरखडे, निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, दिनेश बोथकर, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर आदींनी केली.
‘अनिकेत’च्या मृत्यूस श्रावण जबाबदार असल्याचा ठेवला ठपका
इंझाळा येथील रमेश पाखरे याचा मुलगा अनिकेत (१८) याचा मार्च २०१८ मध्ये मृत्यू झाला. अनिकेतवर श्रावणनेच जादूटोणा केला, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. शिवाय सध्या माझ्या दुसऱ्या मुलाचीही प्रकृती ठिक नाही. त्याच्यावरही श्रावणने जादूटोणा केला. अनिकेतचा जादूटोणा करून श्रावणने बळी घेतला त्यामुळेच आपण त्याचा काटा काढल्याचा कट रचला अशी कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याने पोलिसांना दिली. पुढील तपास सुरू आहे.
हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांड्याची खरेदी
या प्रकरणातील आरोपी ईश्वर पिंजरकर हा मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याचा साडभाऊ आहे. मुख्य आरोपीने साडभावाच्या मध्यस्तीने इतर तीन आरोपींना श्रावणच्या हत्येसाठी पाच हजार रुपयाचे आमिष दिले. नियोजन झाल्यानंतर आरोपींनी मृतकाला मारण्याकरिता नाचणगाव येथील एका हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांडा खरेदी केला. त्यानंतर श्रावणचा काटा काढण्याच्या उद्देशाने आलेल्या अल्पवयीन मुलासह इतर आरोपींना मुख्य आरोपी रमेश पाखरे यांने त्याच्या घरी आश्रय दिल्याचेही तपासात पुढे आले.