शुभांगी केवळ एका प्रवर्गाची की समाजाची ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:30 PM2018-04-05T22:30:48+5:302018-04-05T22:30:48+5:30
शुभांगी मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय होत असल्याचा आरोप करून आदिवासी समाजबांधवांनी रस्त्यावर येत न्यायाची मागणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांची मागणी सार्थ असल्याचे गोंडवाना संघटनांकडून सांगण्यात आले.
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शुभांगी मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय होत असल्याचा आरोप करून आदिवासी समाजबांधवांनी रस्त्यावर येत न्यायाची मागणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांची मागणी सार्थ असल्याचे गोंडवाना संघटनांकडून सांगण्यात आले. आपल्या मुलीवर अन्याय होत असल्याचे पाहून एका हाकेवर विदर्भातील गडचिरोली सारख्या मागास भागातूनही गोंडवाना वर्धेत दाखल झाले. त्यांची संख्या पाहून सर्वच अवाक् झाले. पोलिसांनाही विचार करण्यास बाध्य करणारा हा मोर्चा म्हणावा लागेल!
वर्धेत रूपेश मुळे नरबळी प्रकरण असो, वा हल्ली घडलेले; पण पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केलेले समीर मेटांगळे हत्या प्रकरण असो, अन्यायाची चाहूल लागताच सारेच रस्त्यावर येतात, हा इतिहास आहे. अन्याय-अत्याचार विरोधात आंदोलनातून न्याय मागण्याची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचा हा जिल्हा आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातही वर्धेकरांनी रस्त्यावर येत व्यवस्थेचा निषेध नोंदविला होता. येथे तर शुभांगी वर्धेतील एका आपल्या गावातीलचं! मग, तिच्यासाठी रस्त्यावर येण्यात इतर सामाजिक संघटनांची माघार समाजभान जपणाºया वर्धेकरांच्या भावना बोथट झाल्याचे दर्शविणारी ठरत आहे. याचा कुठेतरी विचार होणे अपेक्षित आहे.
शुभांगीच्या मृत्यू प्रकरणात गोंडवानाने काढलेल्या मोर्चात कदाचित इतर संघटनांना आमंत्रित केले नसावे; पण कुणावर होणाºया अन्यायाविरोधात आवाज उठविण्याकरिता आमंत्रणाची वाट पाहणारे वर्धेकर नाही. न्यायाच्या मागणीत जर ‘ही आमची, तो तुमचा’, असा विचार झाला तर न्याय मिळणे नाही. याचा वेळीच विचार झाला पाहिजे. अन्यथा, शुभांगीला कधीच न्याय मिळणार नाही. म्हणूनच ती कुण्या एका प्रवर्गाची नाही तर या समाजाची म्हणून सर्वांनी एकत्र येत न्यायाकरिता आवाज उठविण्याची गरज आहे.
या प्रकरणात जिल्हा प्रशासनाला निवेदनेही देण्यात येत आहे; पण तेही एका ठराविकांकडूनच, असे का? महिलांवर अत्याचार झाल्यास लढा उभारण्याकरिता नेहमी तत्पर असलेल्या इतर संघटना सध्या या प्रकरणात चुप्पी साधून असल्याचे वर्धेत दिसत आहे. त्यांनी रस्त्यावर येत शुभांगीकरिता आवाज उठविल्यास तिला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे म्हणत जिल्ह्यात गोंडवाना रस्त्यावर उतरले. ही मुलगी त्यांची म्हणून त्यांचा आक्रोश असल्याचे बोलले गेले; पण त्यांच्या आरोपानुसार घटना घडली असेल तर शुभांगी समाजाची म्हणून इतर सामाजिक संघटनांनी रस्त्यावर येणे अपेक्षित होते. तसे झाले नाही, म्हणूनच ती एका प्रवर्गाची की समाजाची, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.