‘शकूनी’च्या ‘शतरंज’ची मोबाईलवर धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:31 AM2017-07-20T00:31:15+5:302017-07-20T00:31:15+5:30
‘शतरंज’ या मनोरंजनात्मक खेळाला पौराणिक इतिहास आहे. महाभारतात कौरवांचा मामा शकूनी हा शतरंजमध्ये पारंगत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘शतरंज’ या मनोरंजनात्मक खेळाला पौराणिक इतिहास आहे. महाभारतात कौरवांचा मामा शकूनी हा शतरंजमध्ये पारंगत होता. याच खेळात पांडव आपले राज्य हारले व वनवासी झाले. महाभारतकालीन शतरंजचा हा खेळ सध्या आधुनिक काळातील मोबाईलवर अधिराज्य गाजवित आहे. मोबाईलमध्ये ‘लुडो किंग’ या नावाने आलेला हा खेळ सोफिस्टीकेट जुगार ठरत आहे. तो सर्वत्र खेळला जात असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
महाभारतात कौरवांना पांडवांचे राज्य हस्तगत करावयाचे होते. यासाठी शतरंज या खेळाचे आयोजन करीत शकूनी मामाने पांडवांना नमविले. हस्तीनापूर राज्यासह द्रौपदीही कौरवांनी जिंकल्याची आख्यायिका आहे. यात शतरंज या खेळाची भूमिका निर्णायक ठरली होती. १५-२० वर्षांपूर्वी हा खेळ आबालवृद्ध खेळत होते. काही ठिकाणी जुगार म्हणून तर कुठे मनोजरंजन म्हणून या खेळाकडे पाहिले जात होते. कालौघात हा पौराणिक खेळ लुप्तच झाला.
आता प्रगत तंत्रज्ञानाने या पौराणिक खेळाला पुन्हा एकदा जिवंत केले आहे. ‘लुडो किंग’ या नावाने हा ‘गेम’ आता प्रत्येकाच्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये दिसू लागला आहे. कुठे केवळ मनोरंजन म्हणून तर बहुतांश युवक जुगार म्हणून हा खेळ खेळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे शकूनीच्या शतरंजची मोबाईलवर धूम दिसून येते. वर्धा जिल्ह्यात सवड मिळताच चार, दोन, तीन युवक मोबाईलवर हा खेळ खेळत असल्याचे दिसून येते. ५० रुपये, १०० रुपये, ५०० रुपये प्रती गेम याप्रमाणे लुडो किंगवर जुगार खेळला जात आहे. बस, ट्रेन, पानठेले, चहा कॅन्टीन, हॉटेल आदी अनेक ठिकाणी हा जुगार खेळला जात असल्याचे दिसते. मोबाईलवर खेळत असल्याने कुणाला जुगार सुरू आहे, हे लक्षात येत नाही. शिवाय पैसे वर दिसत नसल्याने जुगारच खेळत आहे, हे सिद्ध करता येत नाही. यामुळेच लुडो किंग हा जुगाररूपी खेळ युवकांमध्ये प्रसिद्ध होत आहे.
वर्धा शहरात काही दिवसांपूर्वी ‘तीन पत्ती’ या आॅनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून मोठा जुगार खेळला जात असल्याचे समोर आले होते. याप्रमाणेच आता लुडो किंग या गेमचेही अड्डे तयार झाले आहेत. वर्धा, पुलगाव शहरात तर अनेक ठिकाणी हा मोबाईल जुगार चवीने खेळला जात आहे. आता पोलिसांना हे जुगार अड्डे शोधून काढण्याचे आव्हान पेलावे लागणार असल्याचेच चित्र आहे.
तीन पत्तीतून झाली होती उलाढाल
अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये तीन पत्ती हा आॅनलाईन गेम काही वर्षांपूर्वी आला होता. प्रारंभी हा आॅनलाईन खेळ मनोरंजनच वाटत होता; पण वर्धेतील जुगाऱ्यांनी यातही नवी शक्कल लढविली. काही युवकांना रोजगार देत चक्क एकमेकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे प्रकार होत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच धाड टाकली असता धक्कादायक जुगाराचा प्रकार समोर आला होता. यात मोबाईल जप्त करीत काहींना अटक करण्यात आली होती. आता लुडो किंग या जुगाराचे अड्डे पोलिसांना शोधावे लागणार आहेत.
प्रत्येक मोबाईलवर लुडो किंग
सध्या प्रत्येक युवकाच्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये लुडो किंगने एन्ट्री केली आहे. जो-तो लुडो खेळत असल्याचेच दिसते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या खेळाचे अड्डे तयार झालेत. दोन, तीन वा चार युवक एकत्र येऊन मोबाईलवर हा जुगार खेळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. काही ठिकाणी तर दुकानांतही ग्राहक नसल्यास हा जुगार खेळला जात असल्याचे दिसते.