वर्धा बाजार समितीच्या सभापतिपदी श्याम कार्लेकर

By Admin | Published: July 2, 2016 02:19 AM2016-07-02T02:19:03+5:302016-07-02T02:19:03+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची निडणूक शुक्रवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.

Shyam Karlekar as the Chairman of Wardha Market Committee | वर्धा बाजार समितीच्या सभापतिपदी श्याम कार्लेकर

वर्धा बाजार समितीच्या सभापतिपदी श्याम कार्लेकर

googlenewsNext

एकाच गटाचे उमेदवार आमने-सामने : समिती सभागृहात निवडणूक
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाची निडणूक शुक्रवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. या निवडणुकीकरिता एकाच गटातील दोन सदस्यांचे अर्ज आल्याने झालेल्या निवडणुकीत श्याम कार्लेकर ११ मते घेत विजयी झाले. तर गटनेत्याने निवडलेले रमेश खंडागळे यांना सहा मते मिळाली.
शरद देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सभापतिपदकरिता ही निवडणूक होती. समितीत सहकार नेते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख व आ. रणजीत कांबळे यांच्या गटाच्या युतीची सत्ता आहे. यात देशमुख गटाकडे सहा आणि आ. कांबळे गटाडे पाच सभासद आहे. सभापती पदाचा उमेदवार देशमुख गटाचा असावा या पुर्वीच्या निर्णयावर आ. कांबळे गट कायम राहिला. यामुळे त्यांच्याकडे उपसभापती पद कायम आहे. सभापती पदावर देशमुख गटाचा अधिकार असल्याने निवडणुकीकरिता गटाचे श्याम कार्लेकर व रमेश खंडागळे यांनी नामांकन दाखल केले होते. या दोघांपैकी कोणत्या उमेदवाराचा अर्ज कायम ठेवायचा याचा निर्णय गटनेते प्रा. देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे निवडणुकीच्या एक तासापूर्वी दिला. यात रमेश खंडागळे यांचे नाव समोर आले; मात्र या नावाबाबत बाजार समितीतील गटाचे सभासद समाधानी नव्हते.
परिणामी सभागृहात निवडणूक होण्याचे चित्र निर्माण झाले. अशात दुपारी १ वाजताच्या सुमारास निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यात दोनपैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेणे अपेक्षीत होते; मात्र श्याम कार्लेकर यांनी गटनेत्याचे आदेश झुगारत आपला अर्ज कायम ठेवला. त्यांच्या नावाचे सूचक दत्ता महाजन होते तर त्याला अनुमोदन पवन गोडे यांनी दिली. तर रमेश खंडागळे यांच्या नावाचे सूचक उपसभापती पांडुरंग देशमुख यांनी केले तर शरद झोड यांनी अनुमोदन दिले. एकतर्फी होणाऱ्या या निवडणुकीकरिता मतदान झाल्याने देशमुख गटाच्या सभासदांसह भाजप व अपक्षांनी श्याम कार्लेकर यांच्या नावाला पसंती दिली. त्यांना ११ मते मिळली. तर रमेश खंडागळे यांना आ. कांबळे गटाचे पाच व त्यांचे एक अशी एकूण सहा मत मिळाले. यात श्याम कार्लेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक उपनिबंधक जयंत तलमले यांनी काम सांभाळले. त्यांना बाजार समितीचे सचीव समीर पेंडके यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

गटनेत्याचा आदेश धुडकावला
बाजार समितीवर गत अनेक वर्षांपासून जिल्ह्याचे सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांची एकछत्री सत्ता आहे. सभापतिपद त्यांच्या कुटुंबाकडे राहत असल्याचे आतापर्यंत दिसून आले. अशात शरद देशमुख यांच्यावर आलेल्या अविश्वासामुळे सभापतिपदी त्यांच्या निकटस्थ सभासदाची वर्णी लागेल, असे सर्वांना वाटत होते. यावेळी त्यांनी समितीत असलेल्या गटाच्या सभासदांपैकी रमेश खंडागळे यांचे नाव सूचविले; मात्र ते गटाच्या एकाही सदस्याला मंजूर नसल्याचे दिसून आले. सर्वच सदस्यांनी झालेल्या निवडणुकीत गटातील दुसरे उमेदवार श्याम कार्लेकर यांना मतदान केले. यात आ. कांबळे गटाच्या सदस्यांनी त्यांच्या गटनेत्याचा आदेश पाळत प्रा. देशमुख यांनी सूचविलेल्या उमेदवारालाच मतदान केल्याचे समोर आले.

Web Title: Shyam Karlekar as the Chairman of Wardha Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.