स्वावलंबीच्या मैदानावर खिळल्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:30 PM2018-12-02T23:30:46+5:302018-12-02T23:32:16+5:30

नागरिंकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करुन तक्रारीअंती नगर पालिकेने लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमांना बंदी घालण्याचा ठराव पारित केला. पण, आता कार्यक्रमाचा हंगाम आल्याने कार्यक्रमासाठी मैदान मिळविण्याचा खटाटोप सुरु आहे.

Sight of the self-supporting field | स्वावलंबीच्या मैदानावर खिळल्या नजरा

स्वावलंबीच्या मैदानावर खिळल्या नजरा

Next
ठळक मुद्देलोक महाविद्यालय मैदानावर कार्यक्रम बंदी : नगर पालिकेच्या निर्णयानंतरच हालचालींना येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिंकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करुन तक्रारीअंती नगर पालिकेने लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमांना बंदी घालण्याचा ठराव पारित केला. पण, आता कार्यक्रमाचा हंगाम आल्याने कार्यक्रमासाठी मैदान मिळविण्याचा खटाटोप सुरु आहे. काहींनी शहरात दुसरे मैदानच नसल्याची बोंब उठविल्याने स्वावलंबीचे मैदानही कार्यक्रमांना उत्तम पर्याय ठरु शकतो, असे जनमत व्यक्त होतांना दिसून येत आहे. आता पालिका काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्ध्यातील सर्वात मोठे मैदान म्हणून स्वावलंबीचे मैदान ओळखले जाते. सन २०१४ मध्ये याच मैदानावर मोदींची ऐतिहासिक जाहीरसभा घेण्यात आली होती. त्यावेळी अस्वच्छतेने व गवताने वेढलेले हे मैदान साफ करण्यात आले होते. तेव्हापासून याकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्याने येथील परिस्थिती जैसे थे झाली आहे. या मैदानाला गवत व झुडूपांनी वेढलेले असून शहरातील कचराही या मैदानात टाकला जात असल्याने मैदानाचे पर्यायाने नागरिकांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. सध्या हे मैदान अवैध धद्यांचा अड्डा बनले आहे. झाडांच्या आडोशाला अनेक उपद्व्याप सुरु असतात. त्यामुळे हे मैदान जर शहरात आयोजित होणाºया मोठ्या कार्यक्रमांकरिता उपलब्ध करुन दिले तर शहराच्या मध्यभागी असलेले हे मैदान स्वच्छ राहील. तसेच संस्थेलाही उत्पन्न मिळणार आहे. सोबतच अवैध धंद्यांनाही आळा बसणार, अशा प्रतिक्रीया आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ना पार्किंगची समस्या, ना वाहतुकीची कोंडी
लोक महाविद्यालयाच्या मैदानावरील उडणारी धूळ, आवाजाचा त्रास तसेच पार्किंगमुळे परिसरातील नागरिकांना सहन करावा मनस्ताप, यामुळे हे मैदान कार्यक्रमाकरिता देऊ नये, अशी मागणी लावून धरली होती. त्या आधारे नगरसेवक श्रेया देशमुख व प्रदीप ठाकरे यांनी पालिकेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित करुन मैदानावरील कार्यक्रम बंदीचा ठराव सर्वानुमते पारीत केला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागतही होत आहे.
आता कार्यक्रमांसाठी स्वावलंबीचे मैदानच उत्तम पर्याय ठरु शकतो, असेही जनमत निर्माण झाले आहे. स्वावलंबीच्या मैदानाच्या चारही बाजुंनी रस्ता गेला असल्याने या मैदानापासून वस्ती लांब आहेत. तसेच याच मैदानात पार्कींगकरिता मोठी जागा असल्याने नागरिकांची मोठी समस्या सुटणार आहे.
कार्यक्रमांसाठी मोठ्या साऊंडसिस्टिमचा वापर केला तरीही त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होणार नाही. कोणाच्याही घरापुढे वाहने उभी ठेवण्याची वेळ येणार नाही.परिणामी ध्वनी प्रदुषण, अस्वच्छता आणि वाहतुकींची कोंडी या सर्वाला आळा बसणार आहे.
संस्थेतील दोन गटांमुळे अडचण
स्वावलंबी शिक्षण संस्थेतील दोन गटामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे एक गट न्यायालयात गेल्याने या मैदानाचा वाद खितपत पडल्याचे सांगितले जाते. या संस्थेच्या वादामुळे कार्यक्रमाला मैदान देण्यास एका गटाचा होकार आहेत तर दुसऱ्या गटाकडून नकार दिल्या जात असल्याने अडचण वाढली आहे. परिणामी शहरातील मध्यभागी असलेले मोठे मैदान सध्या अवैध धंद्याचे व कचरा साठविण्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.

स्वावलंबीचे मैदान शहरातील सर्वांत मोठे मैदान असून कार्यक्रमांसाठी फार सोयिस्कर ठरणारे आहे. परंतू संस्थेमध्येच वाद असल्याने अडचण निर्माण होत आहे. संस्थांनी आपसी समझोता करुन निर्णय घेतल्यास कार्यक्रमांना हे मैदान उपलब्ध करुन देता येईल. येथे कार्यक्रम घेतल्यास नागरिकाची वाहतूक, पार्कींग व ध्वनी प्रदुषणातून सुटका होईल.
अतुल तराळे, नगराध्यक्ष

लोक महाविद्यालयाचे मैदान कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन देऊ नये, अशी नागरिकांची मागणी असल्याने आमचीही तीच भूमिका आहे. स्वावलंबीचे मैदान जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सहकार्य करु तसेच हासमास्ट लाईट लावण्याचाही आम्ही प्रयत्न करु.
प्रदीप ठाकरे, नगरसेवक

नागरिकांच्या मागणीवरुनच हा कार्यक्रम बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वावलंबी शिक्षण संस्थेने शहरातील कार्यक्रमांसाठी त्यांचे मैदान उपलब्ध करुन द्यावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहे. जर त्यांनी मैदान उपलब्ध करुन दिले तर ते मैदान साफ करण्यासाठी आम्ही सहकार्य करु.
श्रेया देशमुख, नगरसेवक

Web Title: Sight of the self-supporting field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा