पावसाच्या संकेताने बळीराजाची लगबग
By admin | Published: May 30, 2017 01:03 AM2017-05-30T01:03:22+5:302017-05-30T01:03:22+5:30
रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी : बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रोहिणी नक्षत्र लागताच पावसाचे संकेत मिळाले आहे. यामुळे बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून आले आहे. उन्हाळवाहीची कामे पूर्ण करून पेरणीकरिता सारे फाडणे, शेताला कुंपण करणे आदि कामांसह बाजारात बियाण्यांकरिता गर्दी होणे सुरू झाले आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीपात एकूण ४ लाख १८ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होणार असल्याचा आराखडा कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आला आहे. यात २ लाख २२ हजार हेक्टरवर कपाशी तर १ लाख ९ हजार २५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे संकेत कृषी विभागाच्या आराखड्यात आहेत. तर तुरीचा पेरा ७७ हजार ७०० हेक्टरवर होणार असल्याचे आराखड्यात म्हटले आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीपात कपाशीचा पेरा वाढणार असून नियोजित क्षेत्राकरिता संकरित कपाशीची ४ हजार ४४० क्विंटल बियाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सोयाबीची ५३ हजार २६० क्विंटल बियाणे गरजेचे आहे. तर यंदा बाजाराऐवजी इतरत्र भाव खाणाऱ्या तुरीची ४ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत मुबलक बियाणे असून शेतकऱ्यांना भटकंती करावी लागणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांच्यावतीने देण्यात आला आहे.
बियाण्यांसह खतांचीही मागणी होणार असून कृषी विभागाच्यावतीने त्याची मागणी पूर्वीच करून ठेवली आहे. जिल्ह्याला यंदाच्या हंगामात सरळ, संयुक्त आणि मिश्र खते असे एकूण १ लाख २८ हजार २०० क्विंटल खताची गरज आहे. यापेक्षा अधिक खत जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
यात गत हंगामातील काही शिल्लक खताचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामाकरिता कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली असून पावसाचे संकेत मिळत असल्याने शेतकरीही कामाला लागला आहे. रोहिणी नक्षत्र लागताच आकाशात ढग दाटणे सुरू झाले. ढग दाटताच सर्वत्र बळीराजाने शेतीच्या कामांना वेग दिला आहे. शेती कामामुळे ग्रामीण भागात लगबग सुरू झाली आहे.
यंदा मान्सूनपूर्व पेरणीला पाठ
पावसाळा सुरू होण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणी केल्या जात होती. यंदा मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पेरणीला बगल दिल्याचे दिसून आले आहे. ओलिताची सोय असतानाही केवळ कायम असलेल्या तापमानामुळे शेतकऱ्यांनी याला पाठ दिल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण झाली असून जोमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हातबट्ट्याचे व्यवहार
शासनाकडून कर्जमाफी मिळेल या आशेत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही. यामुळे त्यांना नवे कर्ज मिळण्याची आशा मावळली आहे. यामुळे शेतीची कामे हातबट्ट्याच्या व्यवहारावर सुरू आहे. परिणामी बळीराजा पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.