सिग्नलचे डोळे अद्याप मिटलेलेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:01 PM2019-01-21T22:01:51+5:302019-01-21T22:02:11+5:30
वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरात पुन्हा एकदा वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले आहेत. सिग्नल्सचे डोळे अद्याप मिटलेलेच आहेत. यापूर्वीही या यंत्रणेवर लाखो रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. त्यामुळे केलेला खर्च पुन्हा पाण्यात जाणार का? या प्रश्नाने वर्धेकरांच्या मनात घर केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरात पुन्हा एकदा वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले आहेत. सिग्नल्सचे डोळे अद्याप मिटलेलेच आहेत. यापूर्वीही या यंत्रणेवर लाखो रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. त्यामुळे केलेला खर्च पुन्हा पाण्यात जाणार का? या प्रश्नाने वर्धेकरांच्या मनात घर केले आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता, अपघात टाळण्याच्या अनुषंगाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये लाखो रुपये खर्च करून हे दिवे लावण्यात आले आहेत. विकासकामांच्या बाबतीत वरातीमागून घोडे असाच काहीस प्रत्यय येत आहेत. कुठलेही नियोजन नाही. रस्त्याची बांधकामे सुरू असताना आजही अनेक ठिकाणी वीजखांब उभे आहेत. बहुतांश ठिकाणचे अतिक्रमण न काढताच काम सुरू आहे. कुठे लावलेले पेव्हिंग ब्लॉक्स काढण्यात येत आहेत आणि परत लावलेही जात आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची बांधकामे पूर्णत्वास गेल्यानंतर अमृत योजना आणि भुयारी गटार योजनेकरिता रस्तांचे फोडकाम सुरू आहे. ही कामे करताना कुणाचा कुणाशीही समन्वय नाही. एकाच कामावर दुबार-तिबार निधी खर्ची घातला जात असल्याने कर व इतर स्वरूपात शासनाच्या तिजोरीत गोळा झालेल्या जनतेच्याच पैशाची वारेमाप उधळपट्टी केली जात असल्याचे याचि देही याचि डोळा दिसते आहे. मात्र, यावर कुणीही काही बोलायला तयार नाही. पालिका, जिल्हा परिषद आणि दोन विधानसभा मतदारसंघ वगळता संपूर्ण जिल्हा भाजपमय आहे. सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीच विकासकामे मंजूर करून आणीत आहे, कामात नियोजनाचा अभाव असल्याची तेच ओरड करीत आहे आणि चौकशीही मागणीही याच पक्षातील नेतेमंडळी करीत असून जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचाच प्रयत्न केला जात आहे.
वास्तविक, रस्त्याची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर सिग्नल्स उभारण्याची गरज होती. असे असताना कित्येक महिन्यांपासून सिग्नल्स केवळ उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल वाहनाच्या धडकेत दोनदा आडवाही झाला. इतरही दिव्यांवर वाहने आदळतच आहेत. दिवे बंदच ठेवायचे होते, तर हे काम पूर्वीच आटोपण्याचा खटाटोप का करण्यात आला, असा सवाल वर्धेकरांतून उपस्थित केला जात आहे.
सिग्नल दोनवेळा झाले भुईसपाट!
शिवाजी महाराज चौकात नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर मधोमध सिग्नल लावण्यात आला होता. मात्र, वाहनांच्या धडकेने दोनवेळा भुईसपाट झाला. यानंतर प्रशासनाने सिग्नल उभारण्याचे धाडसच दाखविले नाही.
नगरपालिकेकडून नियमित देयक अदा केले जात नसल्याने यापूर्वी उभारण्यात आलेले सिग्नल्स कधीही सुरळीत नव्हते. आता नव्याने उभारण्यात आलेले देयक तरी सुरळीत राहणार का, की यावर झालेला खर्चही व्यर्थ जाणार, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.