सामान्यांच्या हितात जीवनाची सार्थकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:04 AM2019-06-22T00:04:20+5:302019-06-22T00:05:25+5:30
सामान्यांचे हित साधण्यातच जीवनाची सार्थकता राहिली आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ती शक्य असल्याने आरोग्य शिबिरासारखे उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सामान्यांचे हित साधण्यातच जीवनाची सार्थकता राहिली आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ती शक्य असल्याने आरोग्य शिबिरासारखे उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
स्थानिक अग्रवाल धर्मशाळेत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्घाटक म्हणून सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांची उपस्थिती होती. देवळीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, डॉ. पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आकाश लोहकरे, शैलेश अग्रवाल व तुकाराम घोडे महाराज यांची उपस्थिती होती.
गायत्रीदेवी अग्रवाल सेवा संस्था व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित शिबिरात हृदयरोग, स्त्री रोग, बालरोग, नेत्ररोग, चर्मरोग तसेच कान, नाक, घसा, दंत तसेच इतर रोगांचे निदान करून उपचार करण्यात आले. औषधीचे नि:शुल्क वाटप तसेच सावंगी रुग्णालयात भरतीची व्यवस्था करण्यात आली. रुग्णालयामध्ये वर्षभरात केवळ १६० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची मर्यादा असताना यापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करून समाजाचे हित जोपासले जात आहे. मुंबई व नागपूरसारखी अद्ययावत सेवा याठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे, असे अभ्युदय मेघे यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष बकाणे यांनी अग्रवाल यांच्या सेवाकार्याचा आढावा घेतला. यावेळी मोहन अग्रवाल यांचा सामाजिक संस्थाचे वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य शिबिरात देवळी व परिसरातील रुग्णांची मोठ्या संस्थेने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य राहुल चोपडा तर आभारप्रदर्शन दीपक अग्रवाल यांनी केले. यावेळी अनिल नरेडी, इमरान राही, अशोक अग्रवाल, महेश अग्रवाल, नरेश अग्रवाल, अमित भुतडा, लकी टावरी, हरीश ओझा, डॉ. दत्ता कुंभारे, डॉ, सचिन डायगव्हाणे, डॉ. अनिल इनामदार, डॉ. दीप्ती श्रीवास्तव, डॉ. भावना लाखकर, डॉ. आदर्श लता, डॉ. प्रसाद देशमुख, डॉ. अंकुश रघाटाटे तसेच सावंगी रुग्णातील तज्ज्ञ डॉक्टर मंडळीची उपस्थिती होती.