रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:40 PM2018-07-18T22:40:10+5:302018-07-18T22:40:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय रेशीम कोष उत्पादन करून दरमहा उत्पन्न घेता येते. जिल्ह्यात सुमारे ६०० एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुती लागवडीपासून गावातच रोजगार निर्मिती होईल. यामुळे शेतकºयांनी रेशीम शेती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
रेशीम धागा निर्मिती प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शासनाकडून एक एकर तुती लागवड व कीटक संगोपनागृहाचे बांधकामासाठी मनरेगांतर्गत तीन वर्षाकरिता कुशल व अकुशल कामांसाठी प्रती लाभार्थ्याला प्रत्येक एकरासाठी २ लाख ९२ हजार ४६५ रूपये मजुरी स्वरूपात अनुदान देण्यात येते. शिवाय कोषापासून मिळणारे उत्पन्न वेगळे मिळते. त्यामुळे शेतकºयांना रेशीम शेतीपासून रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करून आपले स्त्रोत वाढवावे. यासाठी जिल्ह्यात ६०० एकर वर तुती लागवडीची नोंदणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा रोजंदारीवरील होणारा खर्च शासन करीत आहे. तसेच पारंपारिक पिकापेक्षा कमी खर्च, कमी मेहनत व जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करावी, असे आवाहन नवाल यांनी केले.